Monday, June 8, 2026
Latest NewsPUNE

सतारीच्या झंकारांनी घेतला रसिकांचा ठाव, आरती अंकलीकर यांचा स्मरणीय ‘नंद’

पुणे : सतारीचे झंकार, त्यांना लाभलेली दमदार लयकारीची साथ आणि आरती अंकलीकर यांनी अभिजात गायकीतून रंगवलेला राग नंद, यामुळे ‘सवाई’चे तिसऱ्या दिवशीचे अखेरचे सत्र लालित्यपूर्ण झाले. मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाचे क्रीडासंकुल येथे ७० वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव सुरु असून प्रसिद्ध सतारवादक पुरबायन चटर्जी यांनी सतारीवर छेडलेल्या श्यामकल्याण रागाचा प्रभाव ‘सवाई’ च्या तिसऱ्या दिवशीच्या अखेरच्या सत्रात लक्षणीय ठरला.

“आम्ही सादरीकरणाला प्रारंभ करतो, आम्ही समर्पण भावाने सादरीकरण करू. कलाकार परस्परांना दाद देतील, आम्ही दाद देताना हसू देखील. मात्र आमचे मन मात्र रडते आहे”, असे म्हणून उस्ताद झाकीर हुसेन यांना आदरांजली अर्पण करत पुरबायन चॅटर्जी यांनी सतारवादनाला प्रारंभ केला.

‘या स्वरमंचावर कला सादर करताना मनात सदैव बुजुर्ग कलाकारांच्या आठवणी जाग्या असतात. आज मनात नुकत्याच आपल्याला सोडून गेलेल्या महान कलाकाराची स्मृती जागते आहे. हे कलाकार केवळ पार्थिव स्वरुपात इथे नाहीत, पण प्रत्येक कलाकाराच्या मनात आणि कलाविष्कारात तसेच रसिकांच्या मनात ते चैतन्यरुपाने अस्तित्वात आहेत आणि सदैव राहतील. पंडित भीमसेन जोशी यांच्या मनातही ‘संगीताचा उत्सव साजरा होत राहावा अशी भावना होती. सवाई गंधर्व संगीत महोत्सव हे त्याचेच विशाल रूप आहे, अशी भावनाही पुरबायन चटर्जी यांनी याप्रसंगी व्यक्त केली.

राग श्याम कल्याणमध्ये मोजक्या आलापांतून पुरबायन यांनी सतारवादनाला प्रारंभ केला. ओजस अढिया यांच्या तबल्याच्या अप्रतिम साथीने पुरबायन यांची सतार अधिकाधिक नजाकतदार आणि लालित्यपूर्ण होत गेली. सतारीवर त्यांनी छेडलेल्या स्वराकृती आणि स्वरांचे नक्षीकाम उठावदार होते.

राग मिश्र काफी मध्ये त्यांनी सादर केलेल्या धूनमधून लयकारीचे सुंदर दर्शन घडले. मिश्र पहाडी मध्ये ‘सैयाबिन घर सूना सावरिया…’ हे बोल पुरबायन यांनी गुणगुणले आणि सतारवादनासह त्यांच्यातील गायनाचा रंगही प्रत्ययास आला. दादरा सादर करुन पूरबायन यांनी त्यांच्या वादनाची सांगता केली. त्यांना ओजस अढिया यांनी तबल्यावर वादनाची रंगत खुलवणारी दमदार साथ केली.

सवाईच्या तिसऱ्या दिवशीचे अखेरचे सत्र जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांच्या गायनाने श्रवणीय झाले. त्यांनी राग नंद सादर केला. विलंबित तीनतालात ‘बारे सैया तोहे सकल बन ढूंडू’ या पारंपरिक रचनेतून नंद रागाचे स्वरूप त्यांनी खुलवले. आडा चौताल मधील ‘तन देरेना’ हा तराणा पेश केल्यावर पं. श्रीकृष्ण रातंजनकर यांची त्रितालातील ‘पायल मोरी बाजे झनन…’ ही बंदिशही त्यांनी गायिली. ७ मात्रांचा भैरवी टप्पा गाऊन पं. दिनकर कायकिणी रचित ‘भैरवी प्रियदर्शनी ‘ ही रचना त्यांनी सादर केली. ‘अवघा रंग एक झाला…’ या अभंगाने त्यांनी समारोप केला.

“मी १९८३ साली प्रथम या महोत्सवात गायिले होते. त्यानंतर अनेकदा गाण्याची संधी मिळाली. हा महोत्सव म्हणजे एका शिष्योत्तमाने आपल्या गुरुंप्रती असणाऱ्या अपार श्रद्धा आणि भक्तीचा उत्सव आहे. रसिकांमध्ये युवा चेहरे मोठ्या संख्येने आहेत, याचा आनंद आहे,” असे मनोमन आरती अंकलीकर- टिकेकर यांनी व्यक्त केले.

त्यांना पांडुरंग पवार (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनियम), शुभम उगळे (पखवाज),  स्वरुपा बर्वे खोले व अनुराधा मंडलिक (तानपुरा) यांनी साथ केली. आनंद देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading