पं. व्यंकटेशकुमार यांच्या अनुभवसिद्ध गायनाने साधला कळसाध्याय
अनुपमा भागवत यांच्या सतारीचे सुरेल सूरही झंकारले
पुणे, दि १९ डिसेंबर, २०२४ : ज्येष्ठ गायक पं. व्यंकटेश कुमार यांचा बहारदार मारुबिहाग तसेच सतारीच्या झंकारांवर निनादलेला राग झिंझोटी यामुळे सवाईच्या दुसऱ्या दिवसाचे अखेरचे सत्र स्मरणीय झाले. दुसऱ्या सत्रात प्रसिद्ध सतारवादक अनुपमा भागवत यांच्या सतारीचे सूर सवाईच्या मंडपात झंकारले.

भागवत यांनी सतारीवर राग झिंझोटी छेडला. सतारीच्या इमदादखानी शैलीतील त्यांच्या वादनाला सुरवातीपासूनच रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. रागरूप दर्शवणारे आलाप सादर करत त्यांनी आपल्या घराण्याचा वारसा पुढे नेत असल्याचा विश्वास आपल्या वादनातून दर्शवला. घराण्याचे वैशिष्ट्य असणारे गायकी अंगाचे वादन रसिकांना विशेष भावले. मिश्र पिलू रागातील धून सादर करुन अनुपमा यांनी आपले गुरू उस्ताद विलायत खाँ साहेबांना आदरांजली अर्पण केली. त्यांना अमित कवठेकर यांनी तबल्यावर अनुरूप साथ केली. पन्नालाल राव यांनी तानपुरा साथ केली.
पं. व्यंकटेशकुमार यांच्या अनुभवसिद्ध गायनाने सवाईच्या दुसऱ्या दिवशीचा कळसाध्याय गाठला गेला. राग मारुबिहाग मधील ‘रसिया हो ना’ (विलंबित एकताल) या रचनेच्या माध्यमातून पं. व्यंकटेशकुमार यांनी स्वरांचे आच्छादन निर्माण केले. पाठोपाठ ‘मन मे रहो जियरा…’ या त्रितालातील रचनेतून लयकारीचे दर्शन घडवले.
स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांच्या महानता विशद करून सांगताना पं. व्यंकटेश कुमार म्हणाले, “पंडितजी बडा ख्याल सादर करत असताना पांढरी चारमध्ये गात असत. त्यांचे तानेचे आवर्तन समेपासून समेपर्यंत अखंडित राहत असे. येथे असलेल्या संगीताच्या विद्यार्थ्यांना हे किती अवघड आहे, ते कळू शकेल. मी देखील प्रयत्न केला, पण मला जमले नाही. हे केवळ भीमसेनजींना साध्य झाले; कारण त्यांना दैवी प्रतिभा लाभली होती.”
त्यानंतर राग कौंसी कानडामध्ये त्यांनी ‘राजन के सिरताज…’ ही बंदिश तिलवाडा तालात पेश केली. ‘काहे करत मोसे बरजोरी’ ही द्रुत त्रितालातील रचनाही त्यांनी अतिशय ढंगदारपणे पेश केली. कानडी भक्तिरचना आणि त्याला जोडून ‘ये गं ये गं विठाबाई ‘ ही संत जनाबाई यांची अभंग रचना सादर केली. रसिकांच्या आग्रहास्तव त्यांनी भैरवी सादर करून समारोप केला. त्यांना भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनियम), यांनी अप्रतिम साथसंगत केली. शिवराज पाटील, नागनाथ नागेश, विनायक कोळी यांनी तानपुरा साथ केली. आनंद देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.
