Monday, June 8, 2026
Latest NewsPUNE

स्वातंत्र्याकांक्षा हा सुनीताबाईंचा स्थायीभाव होता : मंगला गोडबोले

पुणे : स्वातंत्र्याकांक्षा हा सुनीताबाईंचा स्थायीभाव होता, असे मत प्रसिद्ध लेखिका मंगला गोडबोले यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित ‘मासिक मनोरंजन’ कार का.र. मित्र व्याख्यानमालेचे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या. ‘मला उमगलेल्या सुनीताबाई देशपांडे’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी अध्यक्षस्थानी होते. प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, कार्यवाह शिरीष चिटणीस यावेळी उपस्थित होते.

गोडबोले म्हणाल्या, पु. लं. आणि सुनीताबाई यांच्यात स्वभावभिन्नता असूनही त्यांचे ५४ वर्षाचे सहजीवन समृद्ध होते. सुनीताबाईंना पद, पैसा आणि प्रतिष्ठेचा मोह थोडाही नव्हता. तर्ककठोरता, न्यायबुद्धी आणि करारीपणा या दुर्मिळ गुणांचा संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होता. लेखकाच्या स्वामित्वहक्कासाठीचा लढा त्यांनी दिला. त्यासाठी त्यांनी कटुता स्विकारली. सुनीताबाईंच्या आत्मचरित्रामुळे अनेक स्त्रियांना वाट सापडली.

            अध्यक्षीय समारोप करताना प्रा. जोशी म्हणाले, महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु.ल.देशपांडे यांच्या पत्नी अशी सुनीताबाईंची सर्वसामान्य लोकांना ओळख असली तरी संवेदनशील आणि कर्तबगार लेखिका, भाषेच्या उत्तम जाणकार, कविताप्रेमी, शिस्तप्रेमी, व्यवहार आणि कर्तव्यदक्ष अशी त्यांच्या व्यक्तिमत्वाची विविध रूपे होती. पुलंकडे अलौकिक प्रतिभा होती. प्रतिभेचं लेणं सुनीताबाईंना लाभलं होतं. पुलंच यश घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. पुलंच्या प्रतिभेच्या, प्रसिद्धीच्या, मोठेपणाच्या तेजात त्यांनी आपले तेज लुप्त होऊ दिले नाही. त्यांनी आपले स्वत्व आणि सत्व प्राणपणाने जपले. पुलं आणि सुनीताबाईंनी सर्जनाचा संसार केला.

सुनिताराजे पवार यांनी प्रास्ताविक केले. शिरीष चिटणीस यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading