Monday, June 8, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

लोकनेते विजय वाकोडे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

 

परभणी : आंबेडकरी चळवळीतील बिनीचे शिलेदार, लढवय्ये नेते  विजय वाकोडे यांचे वयाच्या 64 व्या वर्षी सोमवारी (दि.16) रात्री ह्दयविकाराने दुःखद निधन झाले. मंगळवारी (दि.17) दिवसभर त्यांचे पार्थिव शहरातील राहुल नगरातील समाज मंदिरासमोरील मैदानात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर सायंकाळी राहत्या घरापासून अंत्ययात्रा काढून खंडोबा बाजार स्मशानभुमीत शोकाकुल वातावरणात हजारो अनुयायांच्या उपस्थितीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, भीम आर्मीचे नेते राहुल प्रधान, खा.संजय जाधव, आ.रोहित पवार, आ.राजू नवघरे, माजी आ.सुरेश वरपूडकर, सुरेशराव गायकवाड, माजी मंत्री गंगाधर गाडे यांच्या पत्नी तसेच जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, विेशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप, प्रभारी पोलीस अधीक्षक यशवंत काळे आदींनी वाकोडे यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन श्रध्दांजली वाहिली. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास फुलांनी सजवलेल्या ट्रकमध्ये पार्थिव ठेवण्यात आले. पार्थिवासोबत उपस्थित भिक्कू संघाने पंचशील व त्रिशरण घेतले.
राहुल नगरातून निघालेली अंत्ययात्रा महात्मा फुले कॉलनी, कारेगाव रोड मार्गे गौतम नगर, शिवाजी नगरातून वसमत रोडला पोहोचली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत अंत्ययात्रा पोहोचली. हजारो अनुयायींच्या उपस्थितीत ही अंत्ययात्रा स्टेशन रोडमार्गे गांधी पार्क, छत्रपती शिवाजी चौकातून नानलपेठ कॉर्नरवर गेल्यानंतर अपना कॉर्नरमार्गे खंडोबा बाजार स्मशानभुमीत पोहोचली. रात्री 8.15 वाजता आशिष व सिध्दांत वाकोडे या दोन्ही मुलांनी अग्निडाग देऊन पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.
यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, खा.संजय जाधव, भीमराव हत्तीअंबिरे, सिध्दार्थ हत्तीअंबिरे, रवि सोनकांबळे, माजी महापौर अनिता सोनकांबळे, परभणी बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ घुले, डी.एन.दाभाडे, पुर्णा येथून आलेले प्रकाश कांबळे, उत्तम खंदारे, हर्षवर्धन गायकवाड यांच्यासह सर्व क्षेत्रातील नागरिक आणि हजारो अनुयायी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading