खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘त्या’ प्रकरणी सविस्तर माहिती देतील – धनंजय मुंडे
नागपूर: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आपल्याला गोवण्यामागे राजकारण असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. हे प्रकरण सभागृहात उपस्थित केले असल्यामुळे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणी सविस्तर माहिती देतील. मी सभागृहाबाहेर त्याबद्दल बोलणे हा सभागृहाचा अवमान होईल, असे स्पष्टीकरण त्यांनी केले आहे.
देशमुख यांची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणातील संशयित वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांचा उजवा हात मानला जातो. त्यामुळे या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे नाव देखील गोवले जात आहे. त्याबद्दल विचारले असता मुंडे बोलत होते.
देशमुख यांच्या हत्येबाबत त्यांचे बंधू धनंजय यांनी जबाब दिला आहे. याप्रकरणी पहिल्या दिवसापासून पोलिसांनी कारवाई केली आहे. आरोपींचा तपास करण्यासाठी आठ पथके स्थापन करण्यात आली आहे. चार जणांना अटक करण्यात आली आहे, असे धनंजय मुंडे यांनी सांगितले.
देशमुख यांच्या हत्येसारख्या प्रकरणी आपल्यावर आरोप करण्यामागे निव्वळ राजकारण आहे. आमच्याबरोबर छायाचित्र काढून घेण्यासाठी अनेकजण पुढे येतात. आम्ही कोणाला नाही म्हणत नाही. एखाद्या छायाचित्रामुळे हत्येसारख्या प्रकरणात नाव गोवणे अयोग्य आहे, असेही मुंडे म्हणाले.
देशमुख हत्या प्रकरण सभागृहात मांडण्यात आले आहे. ही हत्या का झाली, याच्या पाठीशी कोण कोण आहेत, याप्रकरणी आतापर्यंत काय तपास झाला आहे, याबद्दल सविस्तर माहिती खुद्द मुख्यमंत्री सभागृहात देणार आहेत. मी सभागृहा बाहेर त्याबद्दल बोलणे हा सभागृहाचा अवमान ठरेल, असेही मुंडे म्हणाले.
