जगन्नाथ शंकरशेठ यांचे योगदान नव्या पिढीला माहिती करून देणे गरजेचे
आरती मोने लिखित नाना शंकरशेठ यांच्या शैक्षणिक कार्यावर प्रकाशझोत टाकणाऱ्या शोधनिबंधाचे सादरीकरण
पुणे : मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेठ यांनी मुंबई शहरात अनेक सामाजिक, विकासात्मक आणि भविष्यवेधी कामे केलीच, याच बरोबर त्या काळी स्त्री शिक्षणाचे बीज रोवत मुलींची पहिली मराठी शाळा सुरु करीत समाज सुधारणेचे देखील मोठे कार्य केले. नाना शंकरशेठ यांनी केलेल्या या कार्यांची माहिती नव्या पिढीला करून देणे ही आज काळाची गरज असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
पुण्यातील गुरुकुल प्रतिष्ठानच्या वतीने आरती मोने लिखित नाना शंकरशेठ यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यावर प्रकाशझोत टाकत त्यांच्या कर्तृत्वाची ओळख करून देणाऱ्या शोधनिबंधाचे सादरीकरण कर्वे रस्त्यावरील स्वामीकृपा सभागृह येथे संपन्न झाले.
नाना शंकरशेठ यांचे खापर पणतू सुरेंद्र शंकरशेठ, नाना शंकरशेठ यांनी मुंबईमध्ये सुरु केलेल्या स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका शमिका आजगांवकर, संस्थेचे खजिनदार सच्चिदानंद हाटकर, गुरुकुल प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अशोक कामत, कार्याध्यक्ष कृष्णा राजाराम अष्टेकर आदी मान्यवर कार्यक्रमावेळी उपस्थित होते. नाना शंकरशेठ यांवरील एका पुस्तकाचे प्रकाशन देखील यादरम्यान करण्यात आले.
नाना शंकरशेठ यांनी जवळपास १७५ वर्षांपूर्वी स्त्री शिक्षण हे एकमेव ध्येय समोर ठेवत मुंबईतील गिरगावात पहिली मुलींची शाळा सुरु केली. त्यांच्या या कार्याचा वसा त्यांचे वंशज आजही पुढे नेत आहेत. इंग्रजी माध्यमाकडे आज पालक व विद्यार्थी आकर्षित होत असले तरीही नाना शंकरशेठ यांनी सुरु केलेली शाळा आजही अभिमानाने उभी आहे. शाळेची पटसंख्या आज कमी झाली असली तरी आमच्या विद्यार्थीनी मेहनतीने आणि जिद्दीने शिक्षण घेत आपापल्या क्षेत्रात प्रगती करीत आहेत, असे यावेळी शमिका आजगांवकर म्हणाल्या.
कोणतेही पालक आपल्या पाल्याला मराठी माध्यमाच्या शाळेत घालण्यास तयार नाहीत ही वस्तुस्थिती सुरेंद्र शंकरशेठ यांनी अधोरेखित केली. २०० मीटर अंतरावर एखादी कॉन्व्हेंट शाळा असल्यास आम्हाला इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु करता येत नाही असा नियम आहे, अशा जाचक नियमांमुळे आमच्यासारख्या मराठी शाळांचे हाल होत आहेत. मेट्रो प्रकल्पामुळे गिरगावातील बहुतांश मराठी माणूस हा स्थलांतर करत असून शाळेच्या पटसंख्येवर परिणाम होत असल्याचे शंकरशेठ यांनी सांगितले. शाळेमध्ये एक विद्यार्थी जरी असला तरी आम्ही शाळा सुरु ठेवू असेही त्यांनी नमूद केले.
मुंबईमध्ये कोणतीही नवी योजना सुरु करताना इंग्रज कसे आवर्जून नानांचा सल्ला घ्यायचे आणि नाना देखील इंग्रजांकडून अनेक गोष्टी कशा करवून घ्यायचे याची उदाहरणेही त्यांनी यावेळी दिली. यानंतर आरती मोने लिखित शोधनिबंधाचे वाचन झाले. याद्वारे नाना शंकरशेठ यांच्या कार्याची प्रदीर्घ ओळख सर्वांना झाली.
यानंतर लेखक श्याम भुर्के यांनी नाना शंकरशेठ आणि पुणे या अनुषंगाने मोलाची माहिती दिली. सती बंदी कायदा, जुगार बंदी कायदा करण्यामध्ये शंकरशेठ यांचे योगदान त्यांनी विशद केले. नाना शंकरशेठ यांनी मुंबईत सुरु केलेली पहिली रेल्वे, जे जे स्कूल ऑफ आर्ट्स, राणीचा बाग आणि मुंबई विद्यापीठ यांचा उल्लेख त्यांनी केला. नाना शंकरशेठ यांनी भारताच्या निर्मितीत एक समाज सुधारक म्हणून दिलेले योगदान आपण विसरता कामा नये. सामाजिक समतेची बीजे रोवताना शंकरशेठ यांनी त्या काळी एकात्मता साधत जातीयता मोडत सर्व धर्माच्या नागरिकांना एकत्र आणले, असेही भुर्के म्हणाले.
शंकरशेठ यांनी स्वत:च्या घरातून समाजकार्याला सुरुवात केली, ही बाब महत्त्वाची असल्याचे डॉ. कामत म्हणाले. नाना शंकरशेठ यांचे कार्य आज नव्या पिढीला माहिती व्हायला हवे आहे. आपण सर्वच मुंबईचे वैभव पाहतो मात्र या मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नानांविषयी बोला असे राज्यातील कोणत्याही पुढाऱ्याला सांगितले तरी, त्यांना ५ मिनिटे देखील त्यांच्याबद्दल बोलता येणार नाही ही शोकांतिका आहे, असेही डॉ. कामत यांनी नमूद केले. शुभदा वर्तक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व आभार मानले.
