किल्ले बनविणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घेणे
इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांचे मत
पुणे : दिवाळीत किल्ले बनविणे ही संस्कृती केवळ महाराष्ट्रतच आहे. याचे कारण जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना गड किल्ल्यांचे आणि सह्याद्रिचे महत्व सांगण्यासाठी त्यांच्याकडून किल्ल्यांची प्रतिकृती बनवून घेतली. यातून बुरूज, माची, बालेकिल्ला म्हणजे काय, ते कसे बांधावे अशा अनेक गोष्टींची शिकवण दिली. गड-किल्ल्यांवरून शत्रूशी कसे लढावे हे शिकवले. आज हे किल्ले बनविणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदिप्यमान इतिहासाचे स्मरण करणे तो पुन्हा समजून घेणे, असे मत इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांनी व्यक्त केले.
नादब्रह्म ढोल ताशा ध्वज पथक ट्रस्ट आयोजित किल्ले स्पर्धा २०२४ या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा भारत इतिहास संशोधक मंडळ, सदाशिव पेठ येथे पार पडला. इतिहास अभ्यासक गणेश हिंगमिरे यावेळी उपस्थित होते. यावेळी नादब्रह्म ट्रस्टच्यावतीने २७ गरजू मुलांना सायकल वाटप करण्यात आले. नादब्रह्म ढोल ताशा ध्वज पथक ट्रस्ट विश्वस्त मंडळ व सर्व वादक उपस्थित होते.
गणेश हिंगमिरे म्हणाले, आपली संस्कृती दुसऱ्याच्या हाती देवू नका. परदेशातील संग्रहालयात आपल्या देशातील ऐतिहासिक वस्तू आपण पैसे देवून बघायला जातो. आपण आपल्या संस्कृतीला सन्मान द्यायला कमी पडलो म्हणून त्यांनी आपल्या देशाला लुटले. परंतु आता नव्या पिढीने असे न होऊ देता, आपली संस्कृती जपली पाहिजे. अशा कार्यक्रमातून आपली संस्कृती येणाऱ्या पिढी पर्यंत पोहचेल. आनंद खंडेलवाल यांनी आभार मानले.
