Monday, June 8, 2026
Latest NewsSports

आदिश्री इंटरप्राईजेस संघाने पटकावले विजेतेपद

 

पुणे : प्रशांत शुक्लाच्या आक्रमक खेळीच्या जोरावर आदिश्री इंटरप्राइजेस संघाने निलेश भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने आयोजित पुणे जिल्हा टेनिस प्रीमियर एन. बी. ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. आदिश्री संघाने अंतिम लढतीत हमराज मृत्युंजय संघावर चार गडी राखून मात केली.

वडगाव बुद्रुक येथील सिंहगड कॉलेजच्या मैदानावर ही अंतिम लढत झाली. ही लढत अखेरच्या चेंडूपर्यंत चुरशीची झाली. हमराज संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ८ षटकांत ८ बाद ८२ धावा केल्या. कर्णधार वसीम शेख (३) झटपट बाद झाल्यानंतर विशाल सरकारने धावगती वाढविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला दुसऱ्या बाजूने अपेक्षित साथ मिळाली नाही. विशालने १७ चेंडूंत सहा चौकार व एका षटकारासह ३५ धावा केल्या. उमेश नायडूने तीन गडी बाद करून हमराज संघाच्या मधल्या फळीला रोखले. लक्ष्याचा पाठलाग करताना आदिश्री संघाची सलामी जोडी नऊ धावांत माघारी परतली होती. मात्र, प्रशांतने एका बाजूने किल्ला लढविला. सहा षटकांअखेर अदिश्री संघाने ३ बाद ४६ धावा केल्या होत्या. अखेरच्या बारा चेंडूंत अदिश्री संघाला विजयासाठी ३७ धावांची गरज होती. आठव्या षटकात हितेश नडार आणि प्रशांतने अनिकेत ताकवणेच्या गोलंदाजीवर २३ धावा वसूल केल्या. यात पहिल्या तीन चेंडूंवर हितेशने ४, ६, ४ धावा वसूल केल्या. यानंतर सहाव्या चेंडूवर प्रशांतने षटकार ठोकला. अखेरच्या षटकात अदिश्री संघाला १४ धावांची गरज होती. पहिल्याच चेंडूवर पप्पू साठेने हितेशला बाद केले. यानंतर राजू पेरुमल एक चौकार व एक षटकार मारून बाद झाला. पुढच्याच चेंडूवर उमेश नायडूही धावबाद झाला. अखेरच्या चेंडूवर चार धावांची गरज असताना प्रशांतने ‘डिप स्क्वेअर लेग’ला षटकार टोकून आदिश्री संघाला विजेतेपद मिळवून दिले. प्रशांतने १५ चेंडूंत तीन चौकार व तीन षटकारांसह नाबाद ३६ धावा केल्या.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण तात्यासाहेब भिंताडे, निलेश भिंताडे, राकेश पवार, राजू रमण, डॉ. दादासाहेब मैन्दाड, सचिन ढवळे यांच्या हस्ते झाले. यावेळी सागर भिंताडे, प्रदीप कंधारे, नितीन पायगुडे उपस्थित होते. सचिन बाड, संदेश पार्टे, अजय आवळे, अफजल मगदूम, रोहित हिंगे यांनी स्पर्धेचे नियोजन केले होते.

धावफलक : हमराज मृत्युंजय – ८ षटकांत ८ बाद ८२ (विशाल सरकार ३५, महेश नानगुडे १३, किसन मरगळे १२, उमेश नायडू ३-८, कुणाल पवार २-२०, राजू पेरुमल १-१०, प्रशांत शुक्ला १-१६) पराभूत वि. अदिश्री इंटरप्राइजेस – ८ षटकांत ६ बाद ८५ (प्रशांत शुक्ला नाबाद ३६, हितेश नडार १६, राजू पेरुमल १०, पप्पू साठे २-१६, विक्रांत निंबाळकर १-७, वाशिक शेख १-१५, ओंकार साळुंके १-१३).

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading