मराठी दैनंदिनी प्रकाशित करण्याचा उपक्रम समाजासाठी आशेच्या प्रकाशकिराणासारखा – डॉ. तावरे
पुणे : तरुण मुलांना मराठी वाचताही येत नाही ही सद्यपरिस्थिती आहे शिवाय आपण जर एखाद्याला पुस्तक भेट दिले तरीते वाचले जाईल याची खात्री नसते अशा परिस्थितीत अविरतपणे, ध्येयवादाने गेली २५ वर्षे मराठी भाषेत दैनंदिनी प्रकाशित करण्याचे गुरुकुल प्रतिष्ठानचे काम हे समाजाच्या दृष्टीने एका आशेच्या प्रकाशकिरणासारखे आहे, अशा भावना प्रसिद्ध लेखिका डॉ. स्नेहल तावरे यांनी व्यक्त केल्या.
गुरुकुल प्रतिष्ठानच्या वतीने प्रकाशित करण्यात येणाऱ्या मराठी दैनंदिनीचे प्रकाशन डॉ. स्नेहल तावरे यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी त्या बोलत होत्या. प्रभात रस्त्यावरील गुरुकुल प्रतिष्ठानच्या कार्यालयात संपन्न झालेल्या कार्यक्रमात प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ अशोक कामत, उपक्रमाच्या समन्वयक शुभदा वर्तक उपस्थित होते.
प्रतिष्ठानच्या वतीने प्रकाशित करण्यात येत असलेली ही संपूर्ण दैनंदिनी मराठी भाषेत असून यामध्ये प्रत्येक दिवसासाठी एक पान दिलेले आहे. प्रत्येक दिवसाचे पंचांग, दिनविशेष यांचा समावेश दैनंदिनीमध्ये असून प्रत्येक पानाच्या खालील बाजूस मराठीतील आदिकवी म्हणून ओळखले जाणाऱ्या इसवी सनाच्या बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात होऊन गेलेल्या संतकवी मुकुंदराज यांच्या ‘विवेकसिंधू’ व ‘परमामृत’ या ग्रंथांमधील ओळी दिल्या आहेत हे विशेष.
नुकताच मराठी भाषेला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिला या पार्श्वभूमीवर मराठी दैनंदिनीचे प्रकाशन करताना आनंद होत आहे असे सांगत डॉ. तावरे म्हणाल्या, “आज जगभरात मराठी भाषेचा अभ्यास होतो आहे, जगभरात मराठी भाषा बोलली जाते आहे. मात्र आजवर कोणालाही संपूर्ण मराठी भाषेत दैनंदिनी काढाविशी वाटली नाही ही आश्चर्याची बाब आहे. मराठी भाषा हे आपले धन असून त्यामध्ये जास्तीत जास्त वाढ होण्यासाठी ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.”
मराठी माणसाला आपण कोणत्या दिशेने चाललो आहोत हे समजण्याची गरज आहे. त्यासाठी योजनापूर्वक काम करणे अतिशय महत्त्वाचे असून यासाठी दैनंदिनी अर्थात रोजनिशी लिहिण्याची सवय ही मोलाचे काम करेल असे डॉ अशोक कामत यांनी सांगितले. दैनंदिनी लिहिण्याचा किती फायदा झाले हे सांगताना डॉ अशोक कामत यांनी आपल्या आयुष्यातील काही प्रसंग उपस्थितांना सांगितले. तुम्ही वक्तशीर, क्रियाशील असाल आणि ध्येयवादाने काम करणारे असाल तर चांगल्या व्यक्तींची साथ तुम्हाला मिळतेच. त्यांमुळे रोजनिशी लिहित योजनापूर्वक काम करण्याची सवत स्वत:ला लावा असे आवाहन डॉ कामत यांनी उपस्थितांना केले.
शुभदा वर्तक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व आभार मानले. डॉ अशोक कामत यांनी प्रास्ताविक केले. वर्तक यांनी दैनंदिनीची वैशिष्ट्ये उपस्थितांना सांगितली.
