Monday, June 8, 2026
Latest NewsPUNE

महाराष्ट्र चित्पावन संघातर्फे देण्यात येणारा पहिला योगेश्वरी पुरस्कार धनश्री लेले यांना प्रदान

पुणे  : ‘योगेश्वरी देवीच्या नावाचा पुरस्कार आनंद, प्रोत्साहन आणि जबाबदारीचे भान जागवणारा आहे. माझ्या ज्ञाती बांधवांनी केलेला हा सन्मान मला कुटुंबियांनी केलेला कौतुकसोहळा वाटतो’, असे उद्गार प्रसिद्ध व्याख्यात्या धनश्री लेले यांनी शनिवारी येथे काढले. महाराष्ट्र चित्पावन संघातर्फे टिळक स्मारक मंदिर येथे आयोजित ‘कोजागर २०२४’ या विशेष कार्यक्रमात पहिला योगेश्वरी पुरस्कार लोकप्रिय व्याख्यात्या धनश्री लेले यांना पु.ना. गाडगीळ ज्वेलर्सच्या वैशाली गाडगीळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अकरा हजार रुपये, योगेश्वरी देवीचा टाक, महावस्त्र व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी महाराष्ट्र चित्पावन संघाचे अध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, कार्याध्यक्ष अजय दाते, कार्यवाह रोहित खरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

पुरस्कार स्वीकारल्यावर मनोगत मांडताना धनश्री लेले म्हणाल्या,’ध्येय असावे सुदूर की जे कधी न हाती यावे, या स्वामींच्या वचनाचे अनुसरण करत  ‘ध्येयी तन्मय व्हावे’ पर्यंत पोचण्यासाठी प्रोत्साहनपर ठरणारा हा पुरस्कार आहे. ज्ञानार्जन आणि ज्ञानदान ही ज्ञातीची वैशिष्ट्ये आहेत. शास्त्र आणि शस्त्र, यावर प्रभुत्व हा आपला विशेष आहे, कारण देश सर्वात महत्त्वाचा, हा आपला संस्कार आहे. या पुरस्काराच्या मागे मला घडवणारे, शिकवणारे कुटुंबीय आणि गुरुजन आहेत, हे कृतज्ञतापूर्वक सांगायला हवे,’. योगेश्वरी देवीचे अष्टक म्हणून लेले यांनी मनोगताची सांगता केली.

वैशालीताई गाडगीळ म्हणाल्या,’धनश्रीताईंना योगेश्वरी पुरस्कार म्हणजे त्यांच्या ओघवती वाणी, विषयतज्ञता, अफाट स्मरणशक्ती आणि सहज शैलीचा गौरव आहे. त्यांच्या जिव्हेवर साक्षात सरस्वतीचा वास असावा, असे सामर्थ्य त्यांच्या वाणीत आहेकार्यवाह खरे यांनी प्रास्ताविकात चित्पावन संघाच्या कार्याची व उपक्रमांची माहिती दिली. अशोक वझे यांनी संघातर्फे उभारण्यात येत असलेल्या परशुराम भवनची माहिती दिली. माजी हवाईदल प्रमुख भूषण गोखले यांनी लेले यांना स्वलिखित ग्रंथ भेट दिला. कार्यवाह सुप्रिया दामले यांनी सूत्रसंचालन केले. अजय दाते यांनी आभार मानले.

उत्तरार्धात  ‘मानवंदना’ हा खास कार्यक्रम सादर करण्यात आला. सुप्रसिद्ध संवादिनी आणि ऑर्गनवादक पं. गोविंदराव पटवर्धन जन्मशताब्दी वर्ष आणि स्वरगंधर्व बाबूजी -अर्थात सुधीर फडके यांना सांगीतिक अभिवादन असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते. किस्से आठवणी गाणी यांची ही सुरेल मैफल आदित्य ओक, विघ्नेश जोशी, कल्याणी जोशी ,अश्विनी वझे, अमित कुंटे आणि सुनील बर्वे या कलाकारांनी रंगवली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading