पाच टर्म खासदार राहिलेल्या कॉँग्रेस खासदाराचा मुलगा करणार मनसेत प्रवेश
पालघर : डहाणू लोकसभा मतदारसंघातून तब्बल पाच वेळा खासदार म्हणून निवडून आलेले दामू शिंगडा यांचे पुत्र सचिन शिंगडा यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली असून लवकरच ते मनसेमध्ये प्रवेश करणार आहेत. महाविकास आघाडीसाठी आणि प्रामुख्याने काँग्रेससाठी हा मोठा धक्का असणार आहे.
सचिन शिंगडा हे काँग्रेसमध्ये सक्रिय असून पालघर जिल्हा काँग्रेसचे ते उपाध्यक्ष आहेत. यापूर्वी त्यांनी ठाणे जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस अध्यक्षपद, डहाणू लोकसभा युवक काँग्रेस सरचिटणीसपद अशा जबाबदाऱ्या पार पाडले आहेत. त्यांना विक्रमगड मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा आहे. मात्र विक्रमगडचे विद्यमान आमदार सुनील भुसारा हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार हे स्पष्ट आहे. अर्थातच ही निवडणूक लढविण्यासाठी सचिन शिंगडा यांनी मनसेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाच वेळा खासदार असलेले दामू शिंगडा हे गांधी घराण्याचे निकटवर्तीय समजले जातात. सन २०२१ मधील कोरोना लाटेत दामू शिंगडा यांचा मृत्यू झाला. डहाणू आणि विक्रमगड परिसरात शिंगडा घराण्याचा दांडगा जनसंपर्क आहे. सचिन शिंगडा यांच्या मनसे प्रवेशामुळे डहाणू मध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
