Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

बुद्धिमान व प्रतिभासंपन्न विद्यार्थ्यांच्या शिक्षणासंदर्भात पुण्यात होणार आंतरराष्ट्रीय संशोधन परिषद

कावेरी गिफ्टेड एज्युकेशन अँड रिसर्च सेंटरच्या वतीने १८ व १९ ऑक्टोबर रोजी परिषदेचे आयोजन  

पुणे : अपवादात्मक सर्जनशीलता, भाषा, तर्क किंवा कला या क्षेत्रांत उल्लेखनीय काम करण्याची क्षमता असलेली बुद्धिमान, प्रतिभासंपन्न (गिफ्टेड) मुले यांचे योग्य संगोपन कसे करावे, त्यांना भविष्यासाठी कशा पद्धतीने मार्गदर्शन करावे यांवर उहापोह करण्यासाठी येत्या १८ व १९ ऑक्टोबर रोजी एका आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदेचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या कावेरी गिफ्टेड एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर (केजीईआरसी) च्या वतीने आणि कन्नड संघाच्या कावेरी कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या विशेष सहकार्याने आयोजित ही दोन दिवसीय परिषद एरंडवणे येथील कावेरी संस्थेच्या शकुंतला जगन्नाथ शेट्टी सभागृहात संपन्न होईल.

‘इल्युमिनेटिंग इंडिया : क्रिएटिंग कनेक्शन्स अमंग गिफ्टेड एज्युकेशन स्टेकहोल्डर्स’ ही या परिषदेची संकल्पना आहे. काउंसिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च (सीएसआयआर)चे महासंचालक  पद्मविभूषण डॉ रघुनाथ माशेलकर आणि केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या पीएमपीवाय व डिजिटल एज्युकेशन विभागाचे अतिरिक्त सचिव आनंदराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत परिषदेचे उद्घाटन शुक्रवार दि १८ ऑक्टोबर रोजी होईल. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुरेश गोसावी, कन्नड संघाचे अध्यक्ष कुशल हेगडे, सचिव मालती कलमाडी देखील उपस्थित असतील.

दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत या विषयातील देशभरातील दिग्गजांची व्याख्याने, सादरीकरणे चर्चासत्रे, पेपर आणि पोस्टर सादरीकरण यांसारखे कार्यक्रम संपन्न होतील. परिषदेविषयी अधिक माहिती देताना परिषदेच्या आयोजन समितीच्या अध्यक्षा मालती कलमाडी म्हणाल्या, “बुद्धिवान व प्रतिभासंपन्न विद्यार्थ्यांसाठी आमची केजीईआरसी ही संस्था देशपातळीवर नाविन्यपूर्ण कार्यक्रम आणि व्यापक संशोधनात्मक काम करत आहे. या मुलांसाठी आश्वासक वातावरण आणि शिक्षण उपलब्ध करून देणे यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या परिषदेद्वारे या क्षेत्रात काम करणारे सर्व भागधारक, संस्था, पालक, धोरणकर्ते यांना एकत्र आणणे हा या आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदेच्या व्यासपीठाचा मुख्य उद्देश आहे.” सदर परिषदेसाठी इंडियन काउंसिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च (आयसीएसएसआर) ने काही निधी देत सहकार्य केले असल्याची माहितीही कलमाडी यांनी दिली. 

सदर संशोधन परिषद ही सशुल्क असून त्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. इच्छुकांनी
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSco-wE7Dnib-or_-DDXH3pnsLiQHRMSTuI-Jcv8fLghDOAVbg/viewform

यावर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading