Monday, June 8, 2026
Latest NewsPUNE

सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरात कन्यापूजन

 

पुणे : श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सवात पुणे मनपा शाळेतील ५१ मुलींचे कन्यापूजन करण्यात आले. या देवी सर्वभूतेषु, शक्ती रुपेण संस्थिता… नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:… या मंगल स्वरांनी श्री महालक्ष्मी मंदिराचा परिसर दुमदुमून गेला. देवीनामाचा जयघोष करीत देवीस्वरुप असलेल्या लहान मुलींनी आपले पूजन होत असल्याचे दृश्य पाहिले आणि त्यावेळी प्रत्येक चिमुकलीच्या चेह-यावरील आनंद काहीसा वेगळा होता.

कार्यक्रमाला सहाय्यक धमार्दाय आयुक्त रेश्मा पुनसे, सोनिया कोंजेटी, ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता अगरवाल, विश्वस्त डॉ. तृप्ती अगरवाल, प्रवीण चोरबेले यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर देखील उपस्थित होते. यावेळी मुलींचे पाद्यपूजन करून त्यांना शालेय साहित्य, सॅक व खाऊ देखील देण्यात आला.

डॉ. तृप्ती अगरवाल म्हणाल्या, शक्ती, बुद्धी आणि धनधान्य देणा-या मातांची रुपे वेगवेगळी आहेत. लहान मुलींंमध्ये ही रुपे दिसतात. कन्या हे देवीचे स्वरुप असते. मात्र, मुलींनी प्रत्येक क्षेत्रात धैर्याने काम करायला हवे. खूप शिकून मोठे व्हायला हवे. तरच देवी प्रसन्न होईल. कुटुंबात मुलगी होणे, ही गर्वाची बाब आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी मुलींनी स्वत:मधील सुप्त गुण सादर करताना विविध गीते म्हटली. याला उपस्थितांनी देखील दाद दिली. अनेक मुली या कार्यक्रमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच मंदिरात आल्या होत्या. उपस्थित सर्वांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading