वृध्द साहित्यिक व कलावंताना मानधन देण्यासाठीच्या समितीच्या अध्यक्षपदी सुरेश धोत्रे यांची नियुक्ती
तळेगाव दाभाडे : वृध्द साहित्यिक व कलावंताना मानधन देण्यासाठी महाराष्ट्र शासन जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतर्गत जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीच्या अध्यक्षपदी अखिल भारतीय नाट्य परिषद तळेगाव शाखेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्याचे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी ही नियुक्ती केली.
याबरोबरच तमाशा शाहीर, लोककला प्रतिनिधी म्हणून प्रदीप कुलकर्णी, भजन कीर्तन प्रतिनिधी म्हणून डॉ. शाम दलाल, नाटय व चित्रपट प्रतिनिधी म्हणून कौस्तुभ कुलकर्णी, नृत्य व संगीत प्रतिनिधी म्हणून मोहित सावंत नारायणगावकर यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीही या समितीवर नियुक्त करण्यात आले आहेत.
नवनियुक्त अध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी याबाबत बोलताना सांगितले, की अनेकदा ज्येष्ठ कलावंत कठीण परिस्थितीत जीवन जगत असतात. त्यांच्याकडे कुणाचे लक्ष जात नाही. एकही ज्येष्ठ कलावंत मानधनाशिवाय राहणार नाही, यासाठी बांधील असणार आहे. त्यामुळे ही समिती पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली गठीत करण्यात आली आहे.
