Monday, June 8, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

Assembly Elections 2024 : पर्वती मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीसाठी टोकाची स्पर्धा

 

पुणे – विधानसभा निवडणुकीची (Assembly Elections 2024घोषणा येत्या आठवड्याभरात होण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर पर्वती मतदारसंघामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. पर्वतीमध्ये सलग तीनवेळा आमदार राहीलेल्या माधुरी मिसाळ यांना त्यांच्याच पक्षातून माजी नगरसेवक श्रीनाथ भिमाले आणि राजेंद्र शिळीमकर यांनी आव्हान दिले असून महाविकास आघाडीमध्येही माजी नगरसेवक आबा बागुल, अश्‍विनी कदम आणि बाळा ओसवाल यांनी जोर लावला आहे. पहिल्या टप्प्यात उमेदवारी मिळविण्यासाठी दोन्ही बाजूच्या इच्छुकांना जोर लावावा लागणार असून उमेदवारी निश्‍चित झाल्यानंतर सहकार्‍यांच्या नाकदुर्‍या काढण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार असल्याचे चित्र सध्यातरी पाहायला मिळत आहे.
विधानसभा मतदारसंघांची फेररचना झाल्यानंतर भाजपच्या माधुरी मिसाळ यांनी सलग तिसर्‍यांदा पर्वती मतदारसंघातून विजय मिळविला आहे. परंतू भाजपच्या सत्ता काळात त्यांना मंत्री मंडळात संधी मिळालेली नाही. मराठा, मागासवर्गीयांसोबतच व्यापारी वर्ग आणि अन्य समाजाचीही मते या मतदारसंघांमध्ये प्रभावशाली असल्याने यंदा त्यांचा कस लागणार आहे. अशातच पक्षातील ज्येष्ठ नगरसेवक श्रीनाथ भिमाले आणि राजेंद्र शिळीमकर यांनीही उमेदवारीसाठी सर्वतोपरी तयारी केली असुन प्रत्यक्षात प्रचारालाही सुरूवात केल्याने भाजपचे अंतर्गत वातावरण तापले आहे.
महाविकास आघाडीकडून सलग सहावेळा नगरसेवक भुषविलेले कॉंग्रेसचे आबा बागुल, माजी नगरसेविका आणि मागील विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या शरद पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या अश्‍विनी कदम आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक बाळा ओसवाल यांनीदेखिल जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. यामुळे या मतदारसंघात भाजप विरूद्ध महाविकास आघाडी असे लढतीचे चित्र दिसत आहे. माधुरी मिसाळ यांना पदाधिकार्‍यांची पसंती असली तरी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर त्यांच्याबद्दल नाराजीचे वातावरण असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळेच यंदा उमेदवार बदलणार अशी आवई भाजपमधूनच उठविण्यात आल्याने पर्वती भाजपमधील वातावरण गंभीर बनले आहे.
नुकतेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुरलीधर मोहोळ यांना पर्वती मतदारसंघातून मताधिक्य मिळाले असले तरी त्यामागे ‘मराठा’ फॅक्टरचा वाटा मोठा असल्याचे दिसून आले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये या फॅक्टर कार्यन्वीत झाल्यास भाजपला निवडणूक तितकीशी सोपी राहाणार नाही. त्याचवेळी मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेची ताकद नगण्य असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला मानणारा मतदार आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने भाजपला कितपत साथ देईल, याबद्दल साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.
महाविकास आघाडीमध्येही तितकेसे आलबेल नाही. आबा बागुल आणि अश्‍विनी कदम या एकाच प्रभागातून प्रतिनिधीत्व करत असूनही दोघांमध्ये फारसे सख्य नाही. बाळा ओसवाल यांना मतदारसंघाच्या दक्षिण भागातून पसंती मिळेल, व्यापारी वर्गाचेही सहकार्य मिळेल परंतू उर्वरीत मतदारसंघातून पाठबळ मिळविण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागणार आहे. या तिनही इच्छुकांमध्ये उमेदवारीसाठी स्पर्धा होउन कोण्याएकास उमेदवारी मिळाल्यास उर्वरीत दोघांची नाराजी दूर करण्याचे मोठे आव्हान राहाणार आहे. या मतदारसंघातून मनसे आणि वंचित आघाडीकडून अद्याप उमेदवार पुढे आलेला नाही. महाविकास आघाडीकडून मराठा समाजाचा उमेदवार दिला गेल्यास पर्वती मतदारसंघातील लढत अत्यंत चुरशीची होईल, असे चित्र सध्यातरी आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading