हिंदू समाज हा बेशरम आणि महामूर्ख लोकांचा समाज; संभाजी भिडे यांचे वादग्रस्त वक्तव्य
सांगली: देशावर असंख्य आक्रमणे झालेला हिंदू समाज हा बेशरम आणि महामूर्ख लोकांचा समाज आहे, असे वादग्रस्त वक्तव्य श्री शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या दुर्गा दौड उद्घाटन कार्यक्रमात बोलताना केले आहे. त्यावरून पुन्हा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.
हिंदी, चिनी आणि हिंदू, मुस्लिम भाई भाई म्हणणाऱ्या हिंदू समाजाला आपला शत्रू कोण आणि मित्र कोण हे समजत नाही. चांगले, वाईट यातला फरक कळत नाही. कारण हा समाज महामूर्ख आहे. लोकांनी गणेशोत्सवाचा चोथा केला आहे. नवरात्रातील दांडिया युवकांना नपुंसक बनवीत आहे. मात्र, आपण नवरात्र उत्सवाची वाट लावू देणार नाही, असेही भिडे म्हणाले.
राजकारण, सत्ताकारण आणि अर्थकारण एक शूद्र, थुंकण्याच्या लायकीचे विषय आहेत. सध्याच्या काळात छत्रपती शिवरायांच्या रक्ताचा सक्षम आणि पराक्रमी समाज निर्माण होणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
त्यांच्या या वादग्रस्त विधानाचे पडसाद राजकारणातही उमटू लागले आहेत. हिंदू समाजाचा अपमान करण्याचा अधिकार भिडे यांना नाही. त्यांच्या या विधानाबद्दल सरकारने कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र, हे सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालणारे आहे, अशा शब्दात त्यांनी महायुती सरकारवरच निशाणा साधला आहे.
