Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNE

मानसिक आजारांबद्दल जागृती होत त्यांना ‘स्टेटस डिसीज’ प्रमाणे हाताळले जायला हवे

समाजसेवक डॉ. राजेंद्र व डॉ सुचेता धामणे दाम्पत्याचे मत
‘सामान्य ते असामान्य’ कार्यक्रमात उलगडला डॉ धामणे दाम्पत्याच्या समाजसेवेचा प्रवास

पुणे  : मधुमेह, उच्च रक्तदाब हे आजार आज ‘स्टेटस डिसिज’ म्हणून समाज समजून घेतो, स्वीकारतो आहे. मात्र, मानसिक आजारांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन वेगळा आहे. जर लग्नानंतर पती मानसिक रुग्ण झाला तर बायको त्याची आयुष्यभर सेवा करते. पण जर हेच महिलेच्या बाबतीत झाले तर पती आणि कुटुंबीय तिचा सांभाळ करणे तर सोडाच उलट तिला बहिष्कृताचे जगणे जगण्यास सोडून देतात. हे चित्र बदलणे आज गरजेचे असून मानसिक आजारांबद्दल जागृत व्हायला हवी असल्याचे मत माऊली सेवा प्रतिष्ठान या निराधार, मानसिक, शारीरिकदृष्ट्या आजारी व पिडीत महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थेचे संस्थापक आणि समाजसेवक डॉ. राजेंद्र व डॉ सुचेता धामणे या दाम्पत्याने व्यक्त केले.

पुण्यातील पी. एम. शहा फाऊंडेशन व वर्धमान प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘सामान्य ते असामान्य’ या प्रकट मुलाखत व संवाद कार्यक्रमात या दोघांनी आपला प्रवास उपस्थितांसमोर उलगडला त्यावेळी ते बोलत होते. सेनापती बापट रस्त्यावरील वर्धमान प्रतिष्ठानच्या सभागृहात सदर कार्यक्रम संपन्न झाला. पी. एम. शहा फाऊंडेशनचे संचालक ॲड चेतन गांधी आणि दिशा बर्वे यांनी डॉ धामणे दाम्पत्याशी संवाद साधला. वर्धमान प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास राठोड यावेळी उपस्थित होते. पी. एम. शहा फाऊंडेशन आणि वर्धमान प्रतिष्ठानच्या वतीने डॉ धामणे दाम्पत्याचा विशेष सत्कार करीत त्यांना मानपत्र, मानचिन्ह, शाल आणि संस्थेसाठी आर्थिक मदत करण्यात आली.

यावेळी बोलताना डॉ राजेंद्र धामणे म्हणाले, “आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ हून जास्त वर्ष झाली असली तरी आज आपल्या समोर गंभीर प्रश्नांची मालिका आहे. मानसिक रुग्ण असलेल्या अनेक माता भगिनींना आपले आयुष्य रस्त्यावर काढावे लागते, हा यातीलच एक महत्त्वाचा प्रश्न. आपण उठता बसता छत्रपती शिवाजी महाराज, फुले- शाहू- आंबेडकर यांचे नाव घेत असतो, मात्र त्यांची शिकवण, त्यांचे विचार अंगीकारायला मात्र विसरतो आहोत.”

मानसिक रुग्ण महिलांसाठी काम करायचे हे कधी ठरविले या प्रश्नाचे उत्तर देताना ते पुढे म्हणाले की, राहत्या गावापासून अहमदनगर या २२ किलोमीटरच्या प्रवासात आम्हाला अनेक मानसिक रुग्ण असलेल्या महिल्या दिसायच्या. तेव्हा मला आणि बायकोला या महिला येतात कुठून हा प्रश्न कायम पडायचा. या विषयाच्या खोलात शिरल्यावर अनेक दुर्दैवी वास्तव समोर आली आणि याच क्षेत्रात काम करायचे हा निश्चय आम्ही दोघांनी केला.”

सुरुवातीला तीन वर्षे आम्ही अशा रुग्ण महिलांना केवळ चांगले अन्न पुरविणे आणि त्यांच्यावर उपचार करणे यावर लक्ष दिले. मात्र ही समस्या मूळापासून सोडवायची असेल तर तात्पुरते उपाय व उपचार करून चालणार नाही हे लक्षात आल्यावर १९९८ साली माऊली संस्थेची स्थापना करून कामाला सुरुवात केली. आज घरातील महिला सुरक्षित नसताना रस्त्यावरील मनोरुग्ण महिलेच्या सुरक्षेचा प्रश्न मोठा असल्याने त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न लक्षात घेत काम सुरु झाले. सुरुवातीला मनोरुग्ण महिलांची सोय आम्ही आमच्या घरीच करीत होतो. पण कालांतराने महिलांची संख्या वाढली तशा सोयी कमी पडू लागल्या. माझ्या सासऱ्यांना आमच्या कामाची तळमळ लक्षात आली आणि त्यांनी संस्थेसाठी ६ एकर जागा भेट म्हणून आम्हाला दिली. आज या ठिकाणी तब्बल ५५० जणांचे माऊली संस्थेचे कुटुंब नांदते आहे, अशी माहिती डॉ सुचेता यांनी दिली.

मानसिक रुग्ण असलेल्या महिलेला केवळ अन्न व निवारा देणे नाही तर सुरक्षितता, प्रेम आणि हरविलेली नाती देणे गरजेचे असते. माऊली या संस्थेच्या माध्यमातून आम्ही हेच करायचा प्रयत्न करीत आहोत, असे डॉ सुचेता यांनी नमूद केले.

रस्त्यावरील अनेक वर्षे राहिल्यामुळे रुग्ण महिलांना अनेक आजार व दुखापती झालेल्या असतात. संस्थेत आल्यावर त्यांच्या आवश्यक त्या सर्व चाचण्या करून त्यांना सर्वोतोपरी उपचार देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. यासोबतच या महिलांना स्वयंपूर्ण करून त्यांच्यात आत्मविश्वास आणि आत्मभान वाढीसाठी देखील संस्था प्रयत्न करते. संस्थेत दाखल झालेल्या महिला या बऱ्या झाल्यानंतर भाजीपाला पिकविणे, संस्थेच्या गायी सांभाळणे, संस्थेच्या असललेल्या २ डेअरी चालविणे, बेकरी चालविणे, स्वत: स्वयंपाक करणे, संस्थेतील मुलांची काळजी घेणे अशी कामे करतात. या महिलांच्या मुलांच्या शिक्षणाची काळजी देखील संस्थेच्या वतीने घेण्यात येते असे डॉ राजेंद्र धामणे म्हणाले.

माणूस जोवर जिंवत असतो, तोवर व्यवस्थेला त्याची काळजी नसते मात्र त्याचा मृत्यू झाल्यावर तो कसा झाला हे सिद्ध करावे लागते हे ह्दयद्रावक सत्य आहे, असे सांगत डॉ राजेंद्र यांनी आजवर त्यांना आलेले अनेक अनुभव कथन केले.

मानसिक आरोग्याचे प्रश्न हे समाजात अनादी काळापर्यंत राहणार असून ते स्वीकार कराला हवे आहेत असे सांगत सामाजिक संतुलनासाठी तरुण पिढीने समाजसेवेत येत प्रामाणिकपणे काम करायला हवे अशी अपेक्षा डॉ राजेंद्र धामणे यांनी व्यक्त केली.

ॲड चेतन गांधी यांनी प्रास्ताविक केले तर दिशा बर्वे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading