Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

फुलंब्री तहसील कार्यालयात मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी

छत्रपती संभाजीनगर: प्रतिनिधी 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाची दखल घ्यावी, यासाठी मराठा आंदोलक आक्रमक झाले असून फुलंब्री येथील तहसील कार्यालयात मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. याशिवाय तहसीलदारांच्या कक्षातील त्यांची खुर्ची बाहेर आणून ती पेटवण्यात आली. 

विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना आरक्षणाच्या प्रश्नाने राज्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे तर मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, या मागणीसाठी ओबीसी नेते अंतरवली सराटीला लागून असलेल्या वडीगोद्री येथे आंदोलन करीत आहेत. धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी पंढरपूर येथे आंदोलन करीत आहे. 

आरक्षणाची आंदोलने चिघळू नयेत यासाठी सरकारकडून विविध स्तरावर चर्चा केली जात आहे. मात्र, या चर्चा म्हणजे सरकारकडून जाणीवपूर्वक वेळ केला जात असल्याची विशेषतः मराठा आरक्षण आंदोलकांची भावना झाली आहे. त्यामुळे हे आंदोलन अधिक उग्र होत असल्याचे चित्र आहे. 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे एक वर्षाहून अधिक काळ आंदोलन करीत आहेत. सहा महिन्यापूर्वी मुंबईच्या वेशीवर पोहोचलेल्या आंदोलकांना सरकारने सगेसयरेचा कायदा आणि इतर मागास प्रवर्गात आरक्षणाचे आश्वासन दिले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला अंतिम इशारा दिला आहे. विफलतेच्या भावनेतून आंदोलकही अधिकाधिक आक्रमक होताना दिसत आहेत. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading