Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी ऑन जॉब ट्रेनिंग या उपक्रमांतर्गत स्टाव्हेंजर विद्यापीठ, नॉर्वेच्या कार्यशाळेत सहभागी

पुणे – : “हायटॅक: हायड्रोजन अर्थव्यवस्थेतील आव्हाने शिक्षण आणि संशोधनाद्वारे सोडवणे” या उपक्रमांतर्गत नुकतीच उन्हाळी कार्यशाळा स्टाव्हेंजर विद्यापीठ, नॉर्वे येथे पार पडली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे (SPPU) विद्यार्थी ऑन जॉब ट्रेनिंग (OJT) या उपक्रमांतर्गत या कार्यशाळेत सहभागी झाले होते. हा उपक्रम नवीन शैक्षणिक धोरण 2020 ला अनुसरून असून विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांमध्ये इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे.

ग्रीन हायड्रोजन ऊर्जा क्षेत्रासाठी वरदान ठरणार आहे. विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञान शिकण्यासाठी आणि त्यातील अडचणी समजून घेण्यासाठी, नॉर्वेजियन डायरेक्टरेट ऑफ हायर एज्युकेशन अँड स्किल्स यांच्या मदतीने हा उपक्रम भारत, नॉर्वे आणि जपानमधील विद्यापीठे आणि संशोधन संस्थांमध्ये राबवला जात आहे. यात स्टाव्हेंजर विद्यापीठ (UiS), साउथ-ईस्टर्न नॉर्वे विद्यापीठ (USN), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU), तोहोकू विद्यापीठ आणि शिबौरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांचा समावेश आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून प्रा. डॉ. अविनाश कुंभार आणि स्टाव्हेंजर विद्यापीठाकडून प्रा. डॉ. ओलेना झावोरोटीनस्का आणि प्रा. डॉ. सचिन चव्हाण यांच्या संयुक्त सहयोगातून हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. विद्यापीठाकडून शिवलिंग सोमनाथ स्वामी, अनुष्का रामदास पवार, श्रुती संतोष शिंगणे आणि अमिना चिविलकर या चार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. हे विद्यार्थी 15 मे ते 15 जुलै 2024 या कालावधीत स्टाव्हेंजर विद्यापीठात होते. त्यांनी संयुक्त प्रबंध आणि संशोधन प्रकल्पांद्वारे हायड्रोजन तंत्रज्ञानातील नवकल्पना आणि व्यावहारिक उपाय शोधण्यावर भर दिला.

18 जून ते 21 जून दरम्यान उन्हाळी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. शैक्षणिक व उद्योग क्षेत्रातील तज्ञांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. अविनाश कुंभार, प्रा. डॉ. सचिन चव्हाण, प्रा. डॉ. ओलेना झावोरोटीनस्का, शून काशिवया (लिंकोपिंग युनिव्हर्सिटी, स्वीडन), अग्निस्का लाझ, स्टेफनो डेलेदा, टोयोटा सतो (जपान) इत्यादी मान्यवरांनी सहभाग घेतला. रिसविका येथील हायड्रोजन प्लांट आणि ईगरसंड येथे सर्वांनी भेट देऊन तिथे चालणारे कार्य समजून घेतले.

हायटॅक प्रकल्प केवळ विद्यार्थ्यांना आवश्यक कौशल्ये आणि ज्ञान प्रदान करण्याचे उद्दिष्ट ठेवत नाही तर आंतरराष्ट्रीय सहयोग मजबूत करणे आणि शाश्वत हायड्रोजन अर्थव्यवस्था निर्माण करणे हा देखील या मागे हेतु आहे. शैक्षणिक संशोधन आणि उद्योगाच्या गरजांमधील अंतर कमी करून, हायटॅक कमी-कार्बन, सुरक्षित आणि परवडणाऱ्या ऊर्जा भविष्याचा मार्ग मोकळा करत आहे आणि त्या साठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आपले सहयोग देत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading