शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांकडून शुल्क वसुली करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करा – सचिन निकम
छत्रपती संभाजीनगर : रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांकडून शुल्क वसुली करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करा स्वाधार योजना तालुकास्तरावर राबवा अश्या विविध मागण्यांसाठी सचिन निकम यांच्या नेतृत्वाखाली समाजकल्याण आयुक्त यांना सहाय्यक समाजकल्याण आयुक्त पी.जि वाभळे यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.
निवेदनात महाडीबीटी प्रणाली मुळे महाविद्यालयास अदा करण्यात येणारे शिक्षण व परीक्षा शुल्क थेट विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे. परंतु संस्थाचालकांनी या निर्णयावर तीव्र आक्षेप असल्याने विविध महाविद्यालयात शिष्यवृत्तीधारक मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण संस्था वेठीस धरत असून शिष्यवृत्ती ची रक्कम दोन दोन वर्षे जमा होत नाही आम्ही कॉलेज बंद करायचे का ? तुमचे ऍडमिशन आम्हाला परवडत नाही, अगोदर पूर्ण फीस भरा मग शिक्षण घ्या , कोरे चेक (धनादेश) द्या, शपथपत्र भरून द्या, अंडरटेकिंग लिहून द्या अश्या प्रकारे अपमान करून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना लक्ष केले जात असल्याने अश्या महाविद्यालयावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेसाठी वसतिगृहासाठी अर्ज करण्याची अट रद्द करा अशी मागणी करण्यात येऊन समाजकल्याण वसतिगृहात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी केवळ 350-400 विद्यार्थी प्रवेश क्षमता असल्याने हजारो विद्यार्थ्यांना वेठीस का धरले जात आहे ? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे. पूर्वीच्या शासन निर्णयात बदल करून योजनेची व्याप्ती तालुकास्तरावर शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वाढविण्याची घोषणा करून शहरापासून 5 किमी च्या हद्दीपर्यंत महाविद्यालयाच्या प्रवेशाची मर्यादा 10 किमी पर्यंत वाढविण्याचे नमूद केले आहे. महागाई निर्देशांक नुसार दरमहा 5 हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात यावी, शैक्षणिक वर्षात किमान 4 टप्यात शिष्यवृत्ती वितरित करावी अश्या मागण्याही निवेदनात करण्यात आल्या आहेत.
यावेळी रत्नदीप रगडे, मंथन गजहंस, सुयोग बनसोडे, विश्वजीत गायकवाड, अक्षय सोनवणे, सुमेध नरवडे, रोहन नेतने, शुभम उबाळे, सुयोग सावंत, सूरज भालेराव, यश गजभिये आदींची उपस्थिती होती.
