काँक्रिटवरील आंतरमहाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धेचा निकाल जाहीर
पुणे : बांधकाम क्षेत्रात महत्व असणाऱ्या काँक्रिट दिनाचे औचित्य साधून महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेनमध्ये (बीएनसीए) ‘काँक्रिट दिना’निमित्त आयोजित केलेल्या आर्किटेक्चर आंतर महाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धेत बीएनसीएतील इरा भाले आणि आकांक्षा गोडसे या विद्यार्थिनींनी प्रथम पुरस्कार पटकावला. तसेच याच महाविद्यालयातील विदिशा चोपडा आणि स्नेहल गांधी यांना द्वितीय पुरस्कार तर तिसरा क्रमांक भारतीय कला प्रसारणी सभेच्या आर्किटेक्चर महाविद्यालयाच्या श्रेयस सूर्यवंशी आणि क्षितीजा पाठक यांना तसेच चैतन्य कांबळे आणि श्रेया सरादे यांना उत्तेजनार्थ पुरस्कारही प्रदान करण्यात आला.
बीएनसीएमध्ये ‘काँक्रिट दिन’ विविध स्पर्धांच्या माध्यमातून साजरा झाला. त्यामध्ये काँक्रिट विषयक प्रश्नमंजुषा बरोबरच, काँक्रिटच्या साच्यातून घडवण्याच्या वस्तूंची निर्मिर्ती तसेच पोस्टर स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले. शहरातील आठ आर्किटेक्चर महाविद्यालयांतील तीस विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. अल्ट्राटेक सिमेंटने या उपक्रमाचे प्रायोजकत्व केले असून अल्ट्राटेक सिमेंटचे तांत्रिक विभागप्रमूख विशाल कुलकर्णी आणि विभागीय विपणन प्रमूख रवीशंकर सिंग यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
काँक्रिटच्या साच्यातून घडवणाऱ्या वस्तूंच्या निर्मितीतील पहिले चार पुरस्कार बीएनसीएतील शिकणाऱ्या विद्यार्थिनीनी मिळवले. प्रथम पुरस्कार : दिशा पिंगळे (द्वितीय वर्ष), द्वितीय पुरस्कार: सृष्टी बागड (द्वितीय वर्ष), तृतीय क्रमांक: मुस्कान अग्रवाल, दिया गुगळे आणि नताशा दारवटकर (तिघीही द्वितीय वर्ष) आणि चतुर्थ पुरस्कार: प्रचिती रजपूत (द्वितीय वर्ष). पोस्टर तयार करण्याच्या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे. प्रथम पुरस्कार: अनिता ढेबे ( तृतीय वर्ष), द्वितीय पुरस्कार: मोहिनी मांडके (द्वितीय वर्ष) आणि तृतीय पुरस्कार: साक्षी मांडेकर ( तृतीय वर्ष) व तनिष्का हातणकर (द्वितीय वर्ष).
‘काँक्रिट दिना’च्या उद्टघाटन सोहळ्यात बीएनसीएचे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप, उपप्राचार्य डॉ. शार्वेय धोंगडे, प्रा. महेश बांगड, बांधकाम कक्षाच्या प्रमूख डॉ. सुजाता मेहता, प्रा. कांचन अतनूरकर, प्रा. प्रीती नामजोशी, प्रा. स्वप्नील शिंदे, आर्किनियरींग (आर्किटेक्चर-इंजिनियरिंग) कक्षाच्या प्रमूख डॉ. पूर्वा कुलकर्णी, संशोधन विभाग प्रमूख डॉ. वसुधा गोखले, ज्येष्ठ आर्किटेक्ट प्रा सुरेश आठवले आणि स्ट्रडकॉम कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक निखिल इनामदार यावेळी उपस्थित होते. बीएनसीएच्या विद्यार्थिनी वेदिका चिंतावार, राशी जांभळे आणि देवकी मानधने यांनी उद्घाटन समारंभात सूत्रसंचालन केले आणि आभार मानले. अल्ट्राटेक सिमेंटच्या विविध उत्पादनांचा स्टॉलही उभारण्यात आला.
त्यापूर्वी निखिल इनामदार यांनी आंतरमहाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे, सुरेश आठवले यांनी काँक्रिट साच्यातून बनवण्याच्या वस्तूंच्या (कास्टींग) स्पर्धेचे आणि डॉ. वसुधा गोखले यांनी पोस्टर स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन केले.
उद्घाटन सोहळ्यात बोलताना बीएनसीएचे उपप्राचार्य डॉ. शार्वेय धोंगडे यांनी अशा उपक्रमांतून औद्योगिक आणि शैक्षणिक समन्वय साधत विकास करणे शक्य असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, बांधकाम क्षेत्रात आर्किटेक्चरबरोबर, तंत्रज्ञान व कलेचाही संबंध येत असताना झालेले बांधकाम किती काळ उभे राहते याचेही शास्त्रही त्यातून शिकवले जाते.
डॉ. सुजाता मेहतांनी काँक्रिट दिनाच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. त्यामध्ये आयोजित करण्यात येत असलेल्या विविध स्पर्धांमधून काँक्रिट बांधकामात येणाऱ्या आधुनिक गोष्टींमधील कल आणि त्याचा विविध प्रकारे होणारा वापर याचे सम्यक ज्ञान करून हा मुख्य हेतू असल्याचे स्पष्ट केले.
विशाल कुलकर्णी म्हणाले की, गेली अनेक वर्षे ‘काँक्रिट दिन’ देशभरात साजरा केला जात असून बांधकाम क्षेत्रामध्ये स्थापत्य अभियंत्यांबरोबरच आता आर्किटेक्ट पदवीधरांसाठी नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. आर्किटेक्ट पदवीधारकांना बांधकाम क्षेत्रात सुरूवातीला खूप कष्ट आणि आव्हाने असली तरी पुढे मोठ्या संधीही मिळत आहेत.
प्रा. सुरेश आठवले यांनी त्यांच्या अमेरिका व भारतातील कामाच्या सुरुवातीच्या कालखंडातील कामांबद्दल बोलताना कष्टांना पर्याय नसल्याचे सांगितले. विविध प्रकारच्या 500 प्रकल्पांमध्ये काम करताना अमेरिकेसह जगभरातील उंच इमारतींचा पाया हा काँक्रिटचाच असतो, असेही स्पष्ट केले.
निखिल इनामदारांनी त्यांच्या पुणे व भारतातील विविध उंच इमारतींच्या बांधकामांचा अनुभव सांगताना काँक्रिट भरण्यासाठी लागणाऱ्या विविध तंत्रज्ञानांचा आढावा घेतला. उंच इमारती बांधण्यासाठी लागणारा कालखंडही कमी करता येतो असे स्पष्ट केले. ते म्हणाले की, उंच इमारतींना असणारा वाऱ्याच्या वेगाचा धोका लक्षात घेता, त्यातील काँक्रिट वापरासाठी अभियंते व आर्किटेक्चरने तयार केलेल्या आराखड्याचे महत्त्वही तितकेच आहे.
डॉ. वसुधा गोखले यांनी इमारतीमध्ये कुमकुवतपणा राहू नये यासाठी भूकंपशास्त्राची त्याला असणारी जोड तसेच आर्किटेक्ट तयार करत असणारा आराखड्यातून होत जाणाऱ्या बांधकामाचे स्पष्ट स्वरूप विशद केले. यासाठी लागणाऱ्या तर्कशुद्ध विचारातूनच बांधले जाणारे घर अधिक भक्कम करण्यासाठी प्रयत्नशील असावे लागते, असेही त्या म्हणाल्या.
