भीमा कोरेगाव विजयस्तंभाच्या विविध मागण्यांसाठी भीमसैनिकांचा भीमा कोरेगाव ते मुंबई सन्मान मार्च
पुणे : भीमा कोरेगाव विजयस्तंभाच्या विविध मागण्यांसाठी भीमा कोरेगाव ते मंत्रालय व मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्या निवासस्थानावर सन्मान मार्चचे दि. १२ सप्टेंबर २०२४ रोजी भीमा कोरेगाव विजय रणस्तंभ सेवा संघाच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. लाखो भीमसैनिकांनी या सन्मान मार्च मध्ये सहभागी होण्याचे आवाहन भीमा कोरेगाव विजय रणस्तंभ सेवा संघाचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत केले. वेळी निलेश गायकवाड, दिपांकर इंगोले व विशाल सोनवणे उपस्थित होते.
या सन्मान मार्च द्वारे करण्यात येणाऱ्या मागण्या –
१) जय स्तंभ वर मागील ११ वर्षापूर्वी वीज कोसळली होती व जय स्तंभाचा वरील भाग खाली कोसळला होता. तो भाग त्यावेळी दुरूस्त केला गेला पण त्याच भागातून दरवर्षी पावसाळ्यात जय स्तंभाचे वरील भागातून पाणी जय स्तंभ मध्ये जाऊन जय स्तंभ मधून सर्व बाजूने पावसाचे पाणी बाहेर पडू लागले आहे व आज जय स्तंभ फुगलेल्या अवस्थेत दिसतो आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर जय स्तंभवर कुठल्याही क्षणी दुर्घटना घडू शकते म्हणून जय स्तंभाची दुरूस्ती त्वरित करण्यात यावी.
२) १ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भीमा येथे झालेली दंगल व ३ जानेवारी २०१८ रोजीचे भारत बंद वेळी आपल्या अंदाजे ३० हजार कार्यकर्तेवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे समिती स्थापन केली होती. मात्र अजूनही गुन्हे मागे घेतले गेले नाहीत. त्यामुळे आपल्या मुलांना शिक्षणात व नोकरीत अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. तरी ते गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे.
३) १ जानेवारी २०१९ रोजी अजितदादा पवार यांनी प्रथमच जय स्तंभ या ठिकाणी मानवंदना दिली व जय स्तंभ विकासकामासाठी १०० कोटी रूपयाची व जय स्तंभ शेजारील खाजगी जमीन अधिग्रहण करण्यात यावी.
४) १ जानेवारी २०१८ पासून शौर्यदिन नियोजनासाठी बार्टीचे माध्यमातून अंदाजे १० कोटी रूपये खर्च करण्यात येतो. तो निधी बार्टीच्या माध्यमातून खर्च न करता १ जानेवारी शौर्यदिनासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात यावी.
५) जय स्तंभ व छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळे पुणे दर्शन मध्ये समाविष्ट करण्यात यावे व शासनाच्या वतीने जय स्तंभ या ठिकाणी इतिहास फलक लावण्यात यावा.
६) जय स्तंभावर १९७१ चे युध्दातील सैनिकांची काळी पाटी लावण्यात आली आहे. ती त्वरीत काढून दुसऱ्या ठिकाणी मानसन्मानाने लावण्यात यावी.
७) जय स्तंभ या ठिकाणी देशभरातून भीमसैनिक येत असतात. त्यांच्यासाठी पुणे स्टेशन ते जय स्तंभ अशी स्वतंत्र बस सोडण्यात याव्यात व येणाऱ्या लोकांसाठी नागरी सुविधा उपलब्ध करण्यात यावी. तसेच पार्किंगसाठी शासकीय जागेवर आरक्षण टाकण्यात यावे.
या प्रमुख मागण्यांसाठी कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाच्या वतीने सन्मान मार्च काढण्यात येणार आहे. हा मार्च कोरेगाव भिमा ,पिंपरी चिंचवड ,लोणावळा ,पनवेल ,वाशी ते चैत्यभूमी दादर व उपमुख्यमंत्री यांच्या निवासस्थानावर जाणार आहे, अशी माहिती कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष सर्जेराव वाघमारे यांनी दिली आहे .
