नवयुवकांवर लक्ष केंद्रित करा – भाजप
नवी दिल्ली : देशाला विकसित बनविण्यासाठी युवा पिढीचे योगदान महत्त्वाचे ठरणार असून पक्षाच्या सदस्य नोंदणी मोहिमेत नवयुवकांवर लक्ष केंद्रित करा, असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिले. त्याचप्रमाणे सीमावरती भागातील गावांमध्ये देखील सदस्य नोंदणी मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
भाजपच्या घटनेनुसार दर सहा वर्षानंतर सदस्यांच्या नोंदणीचे नूतनीकरण केले जाते. त्याचप्रमाणे नवीन सदस्य नोंदणी मोहीम हाती घेतली जाते. नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या सदस्य नोंदणीचे नूतनीकरण करून या मोहिमेचा आरंभ केला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना सदस्य नोंदणीबाबत अनेक सूचना केल्या.
सन २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचे आपले उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी युवा पिढीचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे नवीन सदस्य नोंदणी मोहिमेत १८ ते २५ वयोगटातील नवयुवकांना प्राधान्य द्यावे, असे मोदी यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. या वयोगटातील नवयुवकांनी काँग्रेसच्या सत्ताकाळातील भारत बघितलेला नाही. आपल्या कार्यकाळात विकसित होणाऱ्या भारताचे दर्शन या पिढीला झाले आहे. ही युवा पिढी पक्षासाठी ऊर्जेचा मोठा स्त्रोत ठरेल, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.
त्याचप्रमाणे देशाच्या सीमावर्ती भागातील नागरिकांचे जीवन आपल्या सरकारच्या कार्यकाळात अधिक सुकर झाले आहे. त्यांनी स्थिरता आणि सुशासन याचा अनुभव घेतला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी देशाच्या सीमेवर असलेल्या गावागावांपर्यंत पोहोचून सदस्य नोंदणी करावी, अशी सूचना ही मोदी यांनी केली.
आगामी काळात लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा मध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण दिले जाणार आहे. ही बाब लक्षात घेऊन निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने सदस्य नोंदणी मोहिमेत अधिकाधिक महिलांना सदस्य करून घेण्याच्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे, असे आवाहनही मोदी यांनी केले.
देशासाठी आणि पक्षासाठी वाहून घेतलेले कार्यकर्ते हेच भाजपचे बलस्थान असल्याचे मोदी यांनी नमूद केले. या कार्यकर्त्यांच्या त्याग आणि प्रयत्नांच्या आधारेच भाजपने दोन खासदारांपासून ते दशकाहून अधिक काळ सत्तेत राहण्यापर्यंत मजल मारली आहे, असे त्यांनी नमूद केले.
