Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

विज्ञान-तंत्रज्ञानाबरोबर कलांचे शिक्षण देणारी संयुक्त प्रणाली असावी : डॉ. विजय भटकर

पुणे : विज्ञान, तंत्रज्ञानाचे शिक्षण घेणाऱ्यांनाही कलेची ओढ असू शकते. कला क्षेत्रात संशोधकवृत्ती आणि संशोधन क्षेत्रात कलेची भूमिका असू शकते. त्यामुळे तंत्रज्ञानाबरोबरच कलांचे शिक्षण देणारी संयुक्त प्रणाली असावी, अशी अपेक्षा सुविख्यात शास्त्रज्ञ, पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केली.
गानवर्धन आणि तात्यासाहेब नातू फाऊंडेशनतर्फे स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्काराने पंडित जितेंद्र अभिषेकी आणि विदुषी किशोरी अमोणकर यांच्या शिष्या, आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या गायिका विदुषी देवकी पंडित यांना रविवारी (दि. 1) डॉ. भटकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्या वेळी डॉ. भटकर बोलत होते. खासदार, प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, गानवर्धनचे अध्यक्ष दयानंद घोटकर, तात्यासाहेब नातू फाऊंडेशनचे अध्यक्ष शारंग नातू, डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनच्या सचिव डॉ. भारती एम. डी., गानवर्धनच्या कार्याध्यक्ष वासंती ब्रह्मे मंचावर होते. शाल, सन्मानचिन्ह, मानपत्र, पुष्पगुच्छ आणि पन्नास हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्काराचे यंदाचे 13वे वर्ष आहे.
डॉ. प्रभा अत्रे या चतुरस्र कलाकार होत्या. त्यांचे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात मोठे नाव आहे. त्यांच्या नावे देवकी पंडित यांना पुरस्कार दिला जात आहे, ही मनस्वी आनंद देणारी गोष्ट आहे. हा पुरस्कार त्यांना पुढील सांगीतिक वाटचालीसाठी पथदर्शक ठरेल, असे नमूद करून डॉ. भटकर म्हणाले, आपल्या देशाच्या संस्कृतीची ओळख संगीताच्या माध्यमातून करून देण्यासाठी कार्यरत असणाऱ्या गानवर्धन आणि तात्यासाहेब नातू फाऊंडेशन या संस्थांचा उपक्रम कौतुकास्पद आहे. कोणत्याही क्षेत्रात सराव अत्यंत आवश्यक असून संशोधक वृत्तीने प्रयोग करणे अपेक्षित आहे. शास्त्रीय संगीत ही कला मानसिक शांतता देणारी आहे.

सत्काराला उत्तर देताना देवकी पंडित म्हणाल्या, प्रभाताई संगीतरूपाने आजही आपल्यात आहेत. त्यांच्या प्रेरणादायक सांगीतिक वाटचालीतून आम्हा कलाकारांना संगीताच्या क्षेत्रात काही घडविण्याची उर्मी मिळेल. आम्हा कलाकारांच्या मनात प्रभाताईंविषयी कायमच प्रेम, आत्मियता आणि आदर आहे. डॉ. भटकर यांच्या हस्ते हा पुरस्कार मिळाल्याने आपण भाग्यवंत आहोत, असे सांगून त्या पुढे म्हणाल्या, थोरामोठ्या कलाकारांचे आशीर्वाद, वरदहस्त आणि रसिकांचे प्रेम भरभरून मिळावे.

खासदार, प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, संगीत माणसाला समृद्ध करते. भारतीय संगीत, अभिजात कला हे मानवी भावनांचे उन्नयन करते. देवकी पंडित यांच्या गाण्यातच विनम्रता, साधेपणा, गोडवा नाही तर त्यांच्या वागण्यातही तो जाणवतो. अनेक घराण्यांच्या गुरूंचे त्यांना मार्गदर्शन लाभले आहे. हृदयाचा ठाव घेण्याची ताकद त्यांच्या सूरांमध्ये आहे.

प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करताना दयानंद घोटकर म्हणाले, रसिकांवर सूररूपाने आभाळमाया करणाऱ्या देवकी पंडित यांना पुरस्कार देताना कर्तव्यपूर्तीचे समाधान आहे. शारंग नातू म्हणाले, देवकी पंडित यांचे सूर निकोप आणि निरलस आहेत. प्रभाताईंच्या नावे त्यांना दिला गेलेला मानाचा पुरस्कार त्यांच्या पुढील सांगीतिक वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरेल.

स्वरप्रभा व गानवर्धन यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या गायन स्पर्धेतील विजेत्या मयुरी अत्रे, सुरभी सुरेश, वाणीश्री धन्वंतरी, श्रुती वैद्य, सहाना हेगडे यांचा देवकी पंडित यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. स्पर्धेविषयी विश्वस्त डॉ. विद्या गोखले यांनी माहिती दिली.
मानपत्राचे वाचन वासंती ब्रह्मे यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. निलिमा राडकर यांचे होते. स्वागत दयानंद घोटकर, शारंग नातू, वासंती ब्रह्मे यांनी केले.

पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर विदुषी देवकी पंडित यांच्या शास्त्रीय गायनाची मैफल आयोजित करण्यात आली होती. त्यांना सुयोग कुंडलकर (संवादिनी), रोहित मुजुमदार (तबला), मीरा निलाखे (तानपुरा, सहगायन) यांनी समर्पक साथसंगत केली. देवकी पंडित यांनी राग अल्हैया बिलावलमधील गुरू बबनराव हळदणकर यांची बंदिश, तराणा तसेच गुरू पंडित जितेंद्र अभिषेकी यांची राग परमेश्वरीमधील मध्यलयीतील रचना सादर केली. मैफलीची सांगता अभिषेकीबुवांच्या रचनेने केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading