जागतिक स्नुकर अजिंक्यपद २०२४ स्पर्धा : १३ वर्षीय आरव संचेती याचा अंतिम १६ खेळाडूंमध्ये प्रवेश !!
पुणे आंतरराष्ट्रीय बिलीयर्डस् आणि स्नुकर फेडरेशन (आयबीएसएफ) जागतिक २१ वर्षाखालील स्नुकर अजिंक्यपद २०२४ स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून एकमेव निवड झालेला आणि पुण्यातील १३ वर्षीय आरव सचिन संचेती याने अविस्मणीय कामगिरी करताना साखळी फेरीतून अंतिम १६ खेळाडूंमध्ये आपले नाव निश्चित केले आहे. जागतिक स्पर्धेच्या बाद फेरीत दाखल होऊन अशी कामगिरी करणारा आराव हा राज्यातील पहिला आणि सर्वात लहान वयाचा खेळाडू ठरला आहे.
कर्नाटकातील बंगलोर शहरामध्ये आयबीएसएफ जागतिक १७ आणि २१ वर्षाखालील स्नुकर अजिंक्यपद २०२४ स्पर्धा सुरू आहे. या जागतिक स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून एकमेव खेळाडू म्हणून निवड झालेला १३ वर्षीय आरव हा सर्वात लहान वयाचा खेळाडू होता आणि स्पर्धेमध्ये सहभागी होणार्या भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करत आहे.
साखळी फेरीनंतरच्या पहिल्याच बाद फेरीमध्ये आरव संचेती याने भारताच्याच ताथ्या सचदेव याचा ५९-७०, ४३-३६, ६४-२७, ८५ (६३)-२२ असा पराभव केला. आपल्या विजयामध्ये आरव याने वर्चस्व राखताना ६३ गुणांचा ब्रेकही नोंदविला. आरवसह भारतातील विभास के., राहूल विल्यम्स् आणि महेंद्र चौहान या खेळाडूंनीही विजय मिळवत आगेकूच केली.
या स्पर्धेसाठी आरवसह भारतीय संघातून जबेझ नविन कुमार, राहूल विल्यम्स्, शाम ऑल्विन आणि भाव्य पिपलिया यांची निवड करण्यात आली आहे. आरव संचेती हा राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्नुकर आणि बिलीयर्डस्पटू सचिन संचेती यांचा मुलगा असून आपल्या वडीलांप्रमाणेच त्याने या क्यु स्पोटर्स प्रकारात आपली गुणवत्त सिद्ध केली आहे.
आरव हा यासिन मर्चंट यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील यासिन मर्चंट स्नुकर अॅकॅडमी येथे प्रशिक्षण घेतो. तसेच पीवायसी हिंदू जिमखाना आणि अॅमेरोना फन क्लब येथे सराव करतो. हडपसर येथील ग्लोबल इंडिया इंटरनॅशनल स्कूलमध्ये आरव ८ वी इयत्तेमध्ये शिकत आहे. आयबीएसएफ जागतिक १७ वर्षाखालील स्नुकर अजिंक्यपद २०२३ स्पर्धेमध्येसुद्धा आरव सहभागी झाला होता. ही स्पर्धा रियाध, सौदी अरेबिया येथे झाली होती.
स्पर्धेचा निकालः
महेंद्र चौहान (भारत) वि.वि. श्रीकांत गड्डा (भारत) ३-० (६१-१७, ७८-७, ७० (५३)-५१);
शाहीन साबझी (इराण) वि.वि. क्रिस्टीयन रिचर्ट (जर्मनी) ३-२ (४२-६६, ०-७८ (५८), ६८-९, ६४-२६, ८५-३२);
आरव संचेती (भारत) वि.वि. ताथ्या सचदेव (भारत) ३-१ (५९-७०, ४३-३६, ६४-२७, ८५ (६३)-२२);
राहूल विल्यम्स् (भारत) वि.वि. स्काय चान (हाँगकाँग) ३-२ (२७-७९, ५८-२३, ७५-५६, २९-६२, ७१-२४);
क्वान चुन वाँग (हाँगकाँग) वि.वि. शाम अल्विन (भारत) ३-० (७५-११, ७९-२५, ८०-८);
विभास के. (भारत) वि.वि. मोहम्मद मुसाराफ (श्रीलंका) ३-० (६४-४५, ८२-१०, ६७-३९).
