राजकोट किल्ल्यावर ठाकरे – राणे कार्यकर्ते एकमेकांना भिडले
मालवण : राजकोट किल्ल्यातील (Rajkot fort) छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा किल्ला ढासळल्यानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात तुंबळ रणधुमाळी सुरू आहे. त्यातच आज प्रत्यक्ष घटनास्थळी ठाकरे आणि राणे यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले आणि राड्याला सुरुवात झाली. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करून काही जणांना ताब्यात घेतले. राणे यांच्या कार्यकर्त्यांचा आपल्यावर हल्ला करण्याचा डाव होता, असा आरोप आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केला आहे.
महाविकास आघाडीने पुतळा पडल्याप्रकरणी मालवण तहसील कार्यालयावर मोर्चा आयोजित केला. मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार सहभागी आहेत. मोर्चापूर्वी ठाकरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे कार्यकर्ते देखील पाहणी करण्यासाठी किल्ल्यावर पोहोचले. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर आल्यावर त्यांच्यात राडेबाजी सुरू झाली. मात्र, पोलिसांनी दोन्ही बाजूंना समज देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
काही काळातच एका वृत्त छायाचित्रकाराला रोखण्यावरून भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची पुन्हा जुंपली. अखेर पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन परिस्थितीवर नियंत्रण प्रस्थापित केले.
छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यात राजकारण आणि दंगा करणे योग्य नाही, असे सांगत आपण आपल्या कार्यकर्त्यांना शांत केले. मात्र ही बाब राणे यांच्या पचनी पडणे शक्य नाही. त्यांची बुद्धी त्यांच्या उंची एवढीच आहे, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी राणे यांच्यावर जहरी टीका केली.
राणे आपल्याला घाबरतात. त्यामुळे या घटनेच्या निमित्ताने आपल्यावर हल्ला करण्याचा राणे यांच्या कार्यकर्त्यांचा डाव होता, असा आरोप करतानाच ठाकरे यांनी, आपल्या खिशात कोंबड्या भरलेल्या नाहीत, अशी टीकाही केली.
