Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्ग खड्डे मुक्त करा – नितीन गडकरी

नवी दिल्ली:  चाकरमान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्ग खड्डे मुक्त करा, असे आदेश केंद्रीय महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

तब्बल एक दशकाहून अधिक काळ रखडलेले मुंबई गोवा महामार्गाचे काम हा राजकारण्यांच्या, चाकरमान्यांच्या आणि सर्वसामान्य जनतेचाही टीकेचा, संतापाचा आणि थट्टेचाही विषय बनला आहे राज्यात समृद्धी महामार्गासारखा महत्त्वाकांक्षी महामार्ग प्रकल्प नंतर सुरू होऊन पूर्णही झाला. मात्र, मुंबई गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम रखडलेलेच आहे. त्यातच दीर्घकाळ महामार्ग खड्ड्यांनी व्यापलेला असल्यामुळे चाकरमान्यना मुंबईहून आपल्या कोकणातील घरी पोहोचण्यास तब्बल 16 तासांचा कालावधी लागत आहे.

कोकणवासियांच्या दृष्टीने गणेशोत्सव आणि होलिकोत्सव हे दोन अत्यंत जिव्हाळ्याचे सण उत्सव आहेत. या सणांना हजारो मुंबईकर चाकरमाने आवर्जून कोकणातील आपल्या गावांना भेटी देतात. त्यामुळे या काळात मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणावर वाढत असतो. महामार्गावरील खड्ड्यांमुळे हा प्रवास केवळ त्रासदायक नव्हे तर प्रसंगी जीवघेणा ठरू लागला आहे.

या पार्श्वभूमीवर मुंबईतील शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांनी महामार्गाच्या दुरावस्थेबाबत गडकरी यांची भेट घेऊन त्यांना यासंबंधीचे पत्र सादर केले. या पत्राची दखल घेऊन गडकरी यांनी गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्ग खड्डे मुक्त करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

… त्यासाठी आमची सत्ता येईपर्यंत वाट बघा

केंद्रात आणि राज्यात जोपर्यंत भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांचे सरकार अस्तित्वात आहे तोपर्यंत चाकरमान्यांना चांगल्या अवस्थेतील मुंबई गोवा महामार्ग मिळणे अशक्य आहे. केंद्रातील सरकार केवळ आपल्या मित्रांना कंत्राटे देणे आणि त्याबद्दल कमिशन उकळणे यापलीकडे काहीही करत नाही. सगळे निर्णय वरून होत असतात. इथे गडकरींचेही काही चालत नाही. त्यामुळे चांगला मुंबई गोवा महामार्ग मिळण्यासाठी आम्ही सत्तेवर येईपर्यंत वाट बघा, असा शब्दात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र आणि रज्य सरकारवर टीका केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading