विधानसभा निवडणुकांचा प्रचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच – अशोक चव्हाण
मुंबई: विधानसभा निवडणुकांचा प्रचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच केला जाईल. मात्र, मुख्यमंत्री पदावर कोण असेल याचा निर्णय निवडणूक निकालानंतर महायुतीतील घटक पक्षांचे प्रमुख नेते एकत्र बसून घेतील, असे काँग्रेस मधून भारतीय जनता पक्षात गेलेले खासदार अशोक चव्हाण यांनी सांगितले.
आगामी विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच घडवली जाणार आहे. मात्र, नंतरचा मुख्यमंत्री कोण असेल याचा निर्णय निकालानंतर घेतला जाईल, असे चव्हाण यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सांगितले. निवडणुकीसाठी महायुतीमध्ये जागावाटप करताना प्रत्येक मतदार संघातील परिस्थितीचा विचार करून निवडून येण्याची क्षमता, या प्रमुख निकषावरच जागावाटप करण्यात येईल, असेही चव्हाण यांनी सांगितले.
बदलापूर प्रकरणाचे राजकारण नको
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण अत्यंत दुर्दैवी आहे. अशा प्रकरणांचा परिणाम पीडितेच्या आणि कुटुंबीयांच्या संपूर्ण आयुष्यभर होत असतो मात्र, अशा प्रकारांची राजकारण केले जाऊ नये, असेही चव्हाण म्हणाले.
मराठा आरक्षण हा राजकीय मुद्दा नाही
मराठा आरक्षण हा राजकारणाचा मुद्दा नाही. तो दीर्घ काळ प्रलंबित राहिलेला सामाजिक विषय आहे. एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात या समस्येतून मार्ग काढण्यासाठी प्रक्रियेला अधिक वेग आला आहे. मराठा समाजाला दहा टक्के आरक्षणाचा लाभ मिळत आहे. ज्यांच्याकडे पूर्वी प्रमाणपत्र आहे त्यांना इतर मागास प्रवर्गात आरक्षण मिळत आहे. आरक्षणा संदर्भात काही समस्या शिल्लक आहेत. यासंबंधी सकारात्मक निर्णय घेतले जातील, अशी ग्वाही देखील चव्हाण यांनी दिली.
