दलित चळवळ सक्षम करण्यासाठी सगळ्या नेत्यांनी एकत्र येणं गरजेच – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले
पुणे : दलित चळवळ सक्षम करण्यासाठी सगळ्या नेत्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. आपल्यातच ऐक्य नसेल तर दलित चळवळ उभी कशी राहणार, असा सवाल उपस्थित करून दलित समाजाला सामाजिक न्यायाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर, कवाडे सर यांनी दलित समाजासाठी आरपीआय सोबत यावे, अशी अपेक्षा केंद्रीय सामाजिक न्याय तथा सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केली.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पुणे शहर यांच्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची केंद्रीय सामाजिक न्याय तथा सक्षमीकरण राज्यमंत्री पदी तिसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल सपत्नीक सर्व धर्मिय सत्कार सोहळ्याचे व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाथेरो भन्ते नागघोष (धम्मदायाद बुध्द बिहार), फादर भाऊसाहेब संसारे (रेक्टर, पिपल्स सेमिनरी), ग्याणी अमरजित सिंग (अध्यक्ष, गुरुनानक दरवार रेसकोर्स), संजय भोसले (उपाध्यक्ष, इस्कॉन इंटरनॅशनल), मौलाना सय्यद मुसा (दारूल उलूम, पुणे), रावसाहेब झेंडे (जेष्ठ रिपब्लिकन कार्यकर्ता) यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. यावेळी रिपब्लिकन पार्टि ऑफ इंडिया (आठवले) पक्षाला मिळालेल्या ‘ऊस धारक शेतकरी’ (गन्ना किसान) या निवडणूक चिन्हाचे अनावरण देखील करण्यात आले. यावे अध्यक्षस्थानी आरपीआयचे पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे, महाराष्ट्र प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, महाराष्ट्र प्रदेश सचिव संघटक परशुराम वाडेकर, माजी अध्यक्ष अशोक कांबळे, युवा आघाडीचे पश्चिम महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष निलेश आल्हाट, प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरोदे, प्रदेश सरचिटणीस गौतम सोनावणे, राज्य कार्यकारिणीचे सदस्य मंदार जोशी, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष बाबुराव घाडगे, पुणे शहरचे सरचिटणीस श्याम सदाफुले, युवा आघाडीचे अध्यक्ष वीरेन साठे, प्रदेश सचिव महिला आघाडीच्या संघमित्रा गायकवाड, कार्याध्यक्ष मीना घालते मातंग आघाडीच्या पुणे अध्यक्ष सुनील जाधव आणि मातंग आघाडी महिला पुणे शहराध्यक्ष नेहा पवार आदींसह हजारो आरपीआय कार्यकर्ते उपस्थित होते.
रामदास आठवले म्हणाले, आगामी निवडणुकीत आरपीआयला महायुतीकडून सन्मान जनक जागा मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र निवडणुकीत निवडून यायचे असेल तर पक्ष मजबूत करण्याकडे कार्यकर्त्यांनी लक्ष द्यायला हवे. पक्षांतर्गत गटबाजी देखील कमी झाली पाहिजे. तसेच फक्त दलित मतांवर अवलंबून न राहता इतर मतांवर देखील लक्ष केंद्रीत करायला हवे.
परशुराम वाडेकर म्हणाले, जेव्हा पासून आरपीआयने भाजप सोबत युती केली आहे. तेव्हा पासून आपण महायुतीचा धर्म पाळत त्यांचा प्रचार केला. मात्र, आता आरपीआयला विधानसभा निवडणुकीत सन्मान जनक जागा मिळाल्या पाहिजेत. मग त्या जागा महायुतीतील प्रत्येक पक्षाने आरपीआयला द्यायला हव्यात. आता आम्ही आमचा हक्क मिळविल्या शिवाय राहणार नाही.
आरपीआयचे पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे म्हणाले, गेली 45 वर्ष आम्ही रामदास आठवले यांच्या सोबत आहोत. त्यांचा संघर्ष आणि कारकीर्दीचा मी साक्षीदार आहे. अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी मदत केली. त्यांना दीर्घ आयुष्य लाभो हीच सदिच्छा.
प्रदेश सरचिटणीस गौतम सोनावणे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेसने संविधाना बद्दल अपप्रचार करून मतदारांची मत घेतली. मात्र, जे शासन सार्वजनिक रित्या संविधान दिन साजरा करते ते सरकार संविधान संपवणार नाही, हे आता आपल्याला कळून चुकले आहे. त्यामुळे आगामी काळात आपल्याला भाजपा सोबत सन्मानपूर्वक सत्तेत बसायचे आहे.
तसेच यावेळी भीम शाहीर राजा कांबळे, ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे यांचा सत्कार रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले.
आरपीआयच्या कार्यकर्ता मेळाव्यात संमत करण्यात आलेले ठराव-
१. शिक्षण हक्क कायदयाची इ. ८वी पर्यतं असलेली मर्यादा वाढवून इ. १२ वी पर्यंत करण्यात यावी.
२. सन २०२२ मध्ये पी.एच.डी. करणाऱ्या ७६३ अनुसूचित जाती जमातीच्या विदयार्थ्यांना अधिछात्रवृत्ती अदयाप दिलेली नाही. याच काळात २०२२ मध्ये इतर जाती समुहाच्या विदयार्थ्यांना संपूर्ण अधिछात्रवृत्ती दिलेली असताना राज्य शासन अनुसूचित जाती जमातीच्या विदयार्थ्यांचे हक्क न डावलता २०२२ च्या संपूर्ण पात्र विदयार्थ्यांना पूर्वी प्रमाणे १०० टक्के अधिछात्रवृत्ती देण्यात यावी.
३. अनुसूचित जाती जमातीसाठी अर्थ संकल्पामध्ये मंजूर केलेला निधी १०० टक्के वापरला जावा तसेच सदर निधी जर वापरला नाही तर पुढील आर्थिक वर्षात हा निधी वापरला जावा. या निधीचे इतर कोणत्याही कामासाठी वर्गीकरण करण्यात येवू नये, अशा पध्दतीची तरतुद असलेला नव्याने कायदा करण्यात यावा.
४. जाती निहाय जनगणना करण्यात यावी.
५. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृह, घोले रोड येथील वस्तीगृहाची इमारत बांधून तेथे शिक्षण घेणाऱ्या विदयार्थ्यांना आरोग्य पूर्ण सर्व सोई अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. तसेच पुणे शहरात असलेल्या सर्व सरकारी मनपा खाजगी वस्तीगृहाची समाज कल्याण विभाग आणि पुणे महानगरपालिकेने आरोग्य पूर्णसोई सुविधा आणि सुरक्षिततेची पहाणी करून योग्य त्या उपाय योजना कराव्यात.
६. आगामी विधान सभा निवडणुकीमध्ये पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात किमान १२ जागा भाजपा आणि मित्र पक्षाने सोडाव्यात.
७. अनुसूचित जाती जमातीचा सरकारी नोकच्यांमध्ये असलेला अनुशेष केंद्र सरकार आणि राज्य सरकारने त्वरीत भरून काढण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात यावी.
८. सरकारी नोकऱ्यामधील पदोन्नतीचा प्रश्न त्वरीत मार्गी लावण्यात यावा.
९. पुणे शहारातील पुरग्रस्थांना राज्य शासनाने किमान रु. २५ हजार प्रत्येकी नुकसान भरपाई शासनाने दयावी.
