दिग्गज कलाकारांची गायकी आणि तरुण कलाकरांच्या सादरीकरणाने रंगले आयटीसी मिनी संगीत संमेलन
पुण्यातील मित्र फाउंडेशन आणि कलकत्ता येथील आयटीसी संगीत रिसर्च अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने एरंडवणे येथील डॉ कलमाडी श्यामराव हायस्कूलच्या शकुंतला शेट्टी सभागृह या ठिकाणी या दोन दिवसीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ गायक पद्मश्री पं उल्हास कशाळकर, सुप्रसिद्ध धृपद गायक पं उदय भवाळकर, आयटीसी संगीत रिसर्च अकादमीच्या कथकली जाना आणि मित्र फाउंडेशनचे धनंजय गोखले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संमेलनाचे उद्घाटन संपन्न झाले.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी तरुण गायिका संगबोर्ती दास यांचे ख्याल गायन संपन्न झाले. त्यांनी यावेळी राग भीमपलासची प्रस्तुती केली. यामध्ये त्यांनी ‘आओ चलो पीर के दरबार..’ ही विलंबित एकताल मधील बंदिश गायली. यानंतर त्यांनी ‘संदेसवा मोरा ले जा…’ ही तीनतालामधील रचना सादर केली. दास यांना स्वप्नील भिसे (तबला) व अमेय बिचू (संवादिनी), देविका देशपांडे, संपदा राजने (तानपुरा) यांनी साथसंगत केली.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पं उदय भवाळकर यांचे धृपदगायन रंगले. त्यांनी यावेळी राग देस चे बहारदार सादरीकरण केले. यामध्ये त्यांनी ताल धमार आणि ताल सुलतालमध्ये बंदिशी सादर केल्या. त्यांना प्रताप आवाड (पखावज) प्रसन्न विश्वनाथन व मेघना सरदार (तानपुरा) यांनी साथसंगत केली.
कार्यक्रमाच्या पूर्वार्धात मित्र फाउंडेशनच्या वतीने कलाछाया कथक संस्थेच्या प्रमुख आणि ज्येष्ठ कथक गुरु श्रीमती प्रभाताई मराठे यांना अभिजात भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रकृतीच्या कारणास्तव त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत. त्यांच्या वतीने कलाछाया संस्थेचे भारत जंगम यांनी पुरस्कार स्वीकारला. शाल, व रोख रुपये २५ हजार असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात परमानंदा रॉय यांच्या बासरीवादनाने झाली. पुण्यात सादरीकरण करणे हे प्रत्येक शास्त्रीय संगीत क्षेत्रातील कलाकाराचे स्वप्न असते, आज मी देखील पहिल्यांदाच पुण्यात सादरीकरण करत असल्याने ही संधी मला मिळाली यासाठी मी स्वतः ला भाग्यवान समजतो अशा भावना रॉय यांनी व्यक्त केल्या. राग छायानट प्रस्तुत करीत त्यांनी आपल्या बासरीवादनाला सुरुवात केली. यामध्ये त्यांनी विलंबित रूपक तालातील रचना सादर केली. मिश्र मांज खमाज धून वाजवीत त्यांनी समारोप केला. त्यांच्या बासरी वादनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. रॉय यांना रोहित देव यांनी तबलासाथ तर आरोह ओक यांनी तानपुरा साथ केली.
ज्येष्ठ गायक पद्मश्री पं उल्हास कशाळकर यांच्या गायनाने संमेलनाचा समारोप झाला. पुण्यात गेले दोन तीन दिवस खूपच पाऊस आहे म्हणून मी राग मल्हार गातच नाही असे सांगत कशाळकर यांनी आज राग नंद गातो असे सांगताच सभागृहात हशा पसरला. पंडीत कशाळकर यांनी यावेळी ‘ए बारे सैय्या तोरे सकल बन…’ हा विलंबित ख्याल गायला. यानंतर त्यांनी ‘धन धन भागो नंद को…’ हा छोटा ख्याल सादर केला. पं उल्हास कशाळकर यांना पं योगेश समसी (तबला), मिलिंद कुलकर्णी (संवादिनी), अद्वैत केसकर व साई ईश्वरी महाशब्दे (तानपुरा) यांनी साथसंगत केली. राजश्री गोखले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
