सचिन खिलारी पॅरालिम्पिकसाठी रवाना
पुणे : पॅरिस येथे होणाऱ्या पॅरालिम्पिक स्पर्धेच्या गोळाफेकप्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सचिन खिलारी आज (शनिवार) रवाना होणार आहे. पॅरालिम्पिकमध्ये सचिन एफ-४६ या प्रकारात खेळणार आहे. सचिनने जपान येथील कॅबे या ठिकाणी झालेल्या पॅरा अॅथलेटिक वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक मिळविताना पॅरालिम्पिकचा कोटा मिळविला होता.
मूळ सांगलीच्या असणारा सचिन गेल्या ४ वर्षांपासून पुण्यातील आझम स्पोर्ट्स अकादमीच्या मैदानावर सराव करत आहे. सरावात सातत्य राखणाऱ्या सचिनने सुरुवातीपासून दमदार खेळाच्या जोरावर अनेक स्पर्धांमध्ये यश मिळविले. या स्पर्धेत देखील सचिनने यश मिळवावे यासाठी आज आझम स्पोर्ट्स अकादमीच्या वतीने छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटिन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, उपाध्यक्षा आबेदा इनामदार, सोसायटीचे सचिव इरफान शेख, आझम स्पोर्ट्स अकादमीचे संचालक तथा मार्गदर्शक डॉ. गुलजार शेख यांनी स्पर्धेत धवल यश मिळावे, अशा शुभेच्छा सचिनला दिल्या.
यावेळी बोलताना सचिन खिलारे म्हणाला, मे महिन्यात झालेल्या पॅरा अॅथलेटिक वर्ल्ड चॅम्पियनशिपस्पर्धेत सुवर्णपदक मिळविल्याने या स्पर्धेत देखील चांगली कामगिरी कराताना सुवर्णपदक मिळेल, अशी आशा आहे. यासाठी गेल्या ३-४ महिन्यांपासून सातत्याने सराव करत आहे. पावसामुळे सरावात व्यत्यय येवू नये, यासाठी आझम स्पोर्ट्स अकादमीने मला आवश्यक असणारे शेड बांधून दिले आहे. त्याचा फायदा मला स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यासाठी होणार आहे.
महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटिन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार बोलताना म्हणाले, गेल्या चार वर्षापासून सचिन येथे सराव करत आहे. त्याला सरावासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. क्रिकेटपटू किरण नवगिरे आणि सचिन खिलारी यांच्यासारख्या खेळाडू देशाचे नाव उज्जवल करतात.
यावेळी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटिन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्षा. सचिव इरफान शेख यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडाशिक्षक माजीद शेख यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. गुलजार शेख यांनी केले.
