Thursday, September 24, 2026
Latest NewsPUNE

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मोडी लिपीच्या प्रशिक्षणासाठी सारथी सोबत सामंजस्य करार

 

पुणे : – मोडी लिपीचे पारंपरिक ज्ञान जतन करून पुढच्या पिढीपर्यंत पोचवणे हे इतिहासाच्या अभ्यासकांचे कर्तव्य आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागाने गेली दोन दशके विविध समाजघटकांना मोडी लिपीचे प्रशिक्षण दिले आहे. आता छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या संस्थेसोबत मोडी लिपी प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार केल्यामुळे आपला ऐतिहासिक वारसा समजून त्याचा अन्वयार्थ लावण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होईल.” असा विश्वास मा. कुलगुरू प्रा. सुरेश गोसावी यांनी व्यक्त केला. सारथी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांमध्ये मोडी लिपीच्या प्रशिक्षणासाठीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करताना ते बोलत होते. सारथी संस्थेतर्फे पुणे विभागीय कार्यालयाचे मा. उपव्यवस्थापकीय संचालक श्री अनिल पवार यांनी करारावर स्वाक्षरी केली.

विद्यापीठाच्या इतिहास विभागात ‘मोडी लिपी आणि कागदपत्रांचा चिकित्सक अभ्यास’ हा अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमाची वीस विद्यार्थ्यांची एक तुकडी सारथी संस्था प्रायोजित करेल आणि विद्यापीठ इतिहास विभाग विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करेल असे या कराराचे स्वरूप आहे. सारथीचे पुणे विभागीय कार्यालयाचे उपव्यवस्थापकीय संचालक श्री. अनिल पवार यांनी “सरसेनापती हंबीरराव मोहिते सारथी मोडीलिपी प्रशिक्षण प्रकल्प” या अंतर्गत राज्यातील विविध विद्यापीठांसोबत मोडीलिपी प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार केल्याची माहिती या प्रसंगी दिली. ‘व्यापक दृष्टीने विचार करता सारथी संस्था ज्या मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक हितासाठी योजना राबवीत आहे, त्या समाजाचा इतिहास जाणून घेण्यासाठी देखील मोडी लिपीचे प्रशिक्षण गरजेचे आहे.’ त्यासाठीच हा प्रकल्प राबवीत असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रसंगी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा. ज्योती भाकरे, नवोपक्रम व साहचर्य मंडळाचे संचालक प्रा. संजय ढोले, विषयतज्ञ डॉ. गिरीश मांडके, अभ्यासक्रम समन्वयक प्रा. बाबासाहेब दुधभाते आणि इतिहास विभागातील प्राध्यापक उपस्थित होते. सारथी संस्थेतर्फे पुणे विभागीय कार्यालयाचे उप व्यवस्थापकीय संचालक श्री. अनिल पवार यांच्यासह संशोधन अधिकारी श्रीमती मनीषा अहिरराव, लेखाधिकारी श्री. कुंभार हे उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading