तर उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन राजकारणातून संन्यास घेऊ – देवेंद्र फडणवीस
मुंबई: मराठा आरक्षणासह समाजाच्या हिताचे कोणतेही निर्णय घेताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर आपण आडकाठी केल्याचे सिद्ध झाले तर उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन राजकारणातून संन्यास घेऊ, असे मोठे विधान करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्याकडून वारंवार करण्यात आलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.
मराठा समाजाच्या हिताचे जे काही निर्णय आमच्या सरकारने घेतले त्यासाठी प्रामुख्याने मी स्वतः व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयांच्या पाठीशी आपण कायम ठामपणे उभे राहिलो आहोत. अशावेळी मराठ्यांना आरक्षण मिळू नये यासाठी फडणवीस आडकाठी करीत असल्याचे कथित (नरेटिव्ह) पसरविणे अयोग्य आहे, असेही फडणवीस म्हणाले.
मनोज चरंगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनात त्यांनी सातत्याने फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. मराठ्यांना आरक्षण मिळण्यामध्ये फडणवीस हा एकमेव अडथळा असल्याचा त्यांचा आरोप आहे. फडणवीस एकीकडे मराठा समाजाशी गोडी गुलाबी ने बोलतात आणि दुसरीकडे इतर मागासवर्गीय नेत्यांना मराठा समाजावर सोडतात, असा आरोपही जरांगे पाटील यांनी केला आहे.
या आरोपांना उत्तर देताना फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पद सोडवण्याची, प्रसंगी राजकारणातून संन्यास घेण्याची तयारी दर्शविली आहे.
