रसिकांना अनुभविता येणार ‘दान केलि कौमुदी’ ही संस्कृत नृत्य नाटिका
पुणे : दाक्षिणात्य संगीत पद्धती, उत्तर हिंदुस्थानी संगीत पद्धती, भरतनाट्यम मधील मार्गम् आणि संस्कृतमध्ये सादर होणाऱ्या नृत्यरचना यांचा अनोखा मिलाफ अनुभविण्याची संधी पुणेकर रसिक प्रेक्षकांना जन्माष्टमीच्या पूर्वसंध्येला मिळणार आहे. निमीत्त आहे संस्कृत दिवस व जन्माष्टमीचे औचित्य साधत श्री श्री राधा माधव क्लासिकल फाईन आर्ट्स आणि सुप्रसिद्ध भरतनाट्यम नृत्य कलाकार डॉ स्वाती दैठणकर यांच्या नुपूर नाद संस्थेच्या वतीने आयोजित ‘दान केलि कौमुदी’ या संस्कृत प्रहसन नाटिकेचे.
या नाटिकेच्या शुभारंभाचा प्रयोग रविवार दि २५ ऑगस्ट रोजी टिळक रस्त्यावरील टिळक स्मारक मंदिर येथे सायं ५ वाजत संपन्न होणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश देण्यात येईल.
पुण्यातील डॉ स्वाती दैठणकर या नृत्यविषयक संशोधनासोबतच विविध नृत्य संरचनांद्वारे नवनवे प्रकल्प हाती घेण्यासाठी ओळखल्या जातात. वृंदावनवासी सुप्रसिद्ध आचार्य रूप गोस्वामी (इ. स. १४८९- इ. स. १५६४) लिखित ‘दान केलि कौमुदी’ हे संस्कृत प्रहसन भरतनाट्यम शैलीत सादर करणे, त्यासाठी आवश्यक संशोधन करणे, संरचना करणे आणि सादरीकरण करणे हे शिवधनुष्य त्यांनीच पेलले असून श्री श्री राधा माधव क्लासिकल फाईन आर्ट्स व नुपूरनाद या संस्थांच्या वतीने याचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे.
‘दान केलि कौमुदी’ या नाटिकेतील गोष्ट ही गोवर्धन पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या दान घाटी या ठिकाणी घडते. राधा आणि कृष्णाच्या नात्याचा एक वेगळा पैलू या नाटिकेद्वारे मनोरंजनात्मक पद्धतीने व शास्त्रीय नृत्याच्या माध्यमातून रसिकांसमोर येईल.
याबद्दल अधिक माहिती देताना डॉ. स्वाती दैठणकर म्हणाल्या, “वृंदावनवासी सुप्रसिद्ध आचार्य रूप गोस्वामी हे श्री मध्वाचार्य आणि श्री चैतन्य महाप्रभू यांच्या शिष्य आणि उत्तराधिकारी होते. त्यांना भक्ती रसाचे प्रणेते म्हटले जाते. त्यांनी भक्ति साहित्यात अमूल्य आणि विपुल साहित्य निर्मिती केली असून ‘दान केलि कौमुदी’ हे त्यांनी लिहिलेले संस्कृत प्रहसन हे दान लीलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. त्यांचे हे साहित्य नाट्यरुपात बसविणे हे माझ्यासाठी गोवर्धन पर्वत उचलण्यासारखेच होते. दशरूपकातील एक रुपक असलेली ही भाणिका सामान्य प्रेक्षकांना कळावी आणि ती करीत असताना मूळ गद्यांना धक्का लागू नये याचा मी प्रकर्षाने विचार केलाच शिवाय पारंपारिक भरतनाट्यमच्या माध्यमातून ही भाणिका आम्ही आगळ्यावेगळ्या पद्धतीने सादर करणार आहोत. कथेच्या गरजेप्रमाणे येणारे काव्यात्मक निवेदन हे या सादरीकरणाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.”
‘दान केलि कौमुदी’ या नृत्य नाट्यासाठीचे संशोधन, नृत्यसंरचना दिग्दर्शन आणि सादरीकरण हे डॉ स्वाती दैठणकर यांचे आहे. या नाटिकेत डॉ स्वाती दैठणकर या स्वतः सूत्रधाराची भूमिका निभावणार असून नृत्य सादरीकरण करतांना कथानकाचे निवेदन करणे ही एक आव्हानात्मक बाब प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
यासाठी डॉ धनंजय दैठणकर यांनी संगीत दिले आहे. तर देवदत्त मनीषा बाजी यांनी संगीत संयोजन केले आहे. नंदिनी राव गुजर आणि मेहेर परळीकर यांनी यामध्ये गायन केले असून नुपूर दैठणकर यांनी राधा तर कोहिनूर दर्डा यांनी कृष्णाची भूमिका वठविली आहे. नुपुरनाद संस्थेच्या १२ नृत्य कलाकारांचाही यामध्ये समावेश आहे. नजीकच्या भविष्यात याचे प्रयोग संपूर्ण देशभरात होणार असल्याची माहिती डॉ दैठणकर यांनी कळविली आहे.
