रमणबाग शाळेमध्ये सुरक्षा रक्षक, स्वच्छता कर्मचारी,रिक्षावाले काका यांना राखी बांधून अनोख्या रक्षाबंधनासह संस्कृत दिन साजरा
पुणे : न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत रक्षाबंधन आणि संस्कृत दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. विनया क्षीरसागर उपस्थित होत्या. आपल्या भाषणातून त्यांनी आपली वाणी, आपली भाषा शुद्ध होण्यासाठी संस्कृत शिकणे महत्त्वाचे आहे प्रत्येक विषयाचे मूलज्ञान आणि प्रगतज्ञान हे आपल्याला संस्कृत मधूनच मिळते. संस्कृत दिन आणि रक्षाबंधन यांचा जवळचा संबंध आहे असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुख्याध्यापिका चारुता प्रभुदेसाई यांनी रक्षाबंधन आणि संस्कृत दिनाचे महत्त्व सांगितले
रक्षाबंधन सण आपण का साजरा करतो हे प्रतिभा वडनेरकर यांनी चिंतनातून व्यक्त केले.
यावेळी प्रशालेतील स्वच्छता कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचारी यांच्या प्रति बांधिलकी म्हणून विद्यार्थ्यांनी त्यांना भेटवस्तू देऊन राखी बांधली. तसेच विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे सर्व रिक्षा आणि व्हॅन काकांना विद्यार्थ्यांनी राखी बांधली.
प्रशालेतील प्रत्येक घटकाप्रती कृतज्ञता म्हणून प्रयोगशाळा साहित्य, संगणक कक्ष शालेय परिसरातील वृक्ष,शाळेचे महाद्वार तसेच शालेय बागेतील श्रीकृष्ण मूर्तीला विद्यार्थ्यांनी राखी बांधली आणि सामाजिक रक्षाबंधन साजरे केले. वर्गावर्गात विद्यार्थ्यांनी एकमेकांना व शिक्षकांना राखी बांधून एकमेकांविषयी बंधुभाव दृढ केला.
डॉ. विनया क्षीरसागर यांनी ग्रंथालयातील पुस्तकांना राखी बांधली त्याच वेळी श्रीमती वर्षा गानू यांनी एकात्मता मंत्र म्हटला.
संस्कृत दिनानिमित्त प्रशालेतील शिक्षिकांनी संस्कृतगीत गायन केले. विद्यार्थ्यांनी मंगलाचरण सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली. नाट्यसंवाद ,
स्तोत्रवाङमय, संस्कृत कथा,गीत यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केले. प्रशालेतील 36 वर्गांमध्ये 36 संस्कृत सुविचारांचे लेखन करण्यात आले.
प्रमुख पाहुण्यांचा परिचय वर्षा गानू यांनी करून दिला
शितल पवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली. सूत्रसंचालन श्रीमती शारदा जोशी यांनी केले. कार्यक्रमाला उपमुख्याध्यापक श्री. जयंत टोले तसेच पर्यवेक्षिका अंजली गोरे, मंजुषा शेलूकर हे उपस्थित होते.
