शरद पवार यांना निमंत्रण न देणे हा महायुती सरकारचा कोतेपणा – खासदार डॉ अमोल कोल्हे
पुणे : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभाचा शासकीय कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल बालेवाडी येथे होत असताना महिला सक्षमीकरणासाठी कायम पुढाकार घेणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख खासदार शरद पवार यांना निमंत्रण न देणे हा महायुती सरकारच्या मनाचा कोतेपणा आहे, अशी टीका खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी केली.
बालेवाडी क्रीडा संकुल येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यासह राज्यातील अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. मात्र, या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख नाही. त्यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे.
महिला सबलीकरणासाठी शरद पवार यांनी कायम पुढाकार घेतला आहे. देशात सर्वप्रथम महिलांसाठी स्वतंत्र धोरणाची आखणी, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी 33 टक्के आरक्षण, महिला बालकल्याण विभागासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना ही सर्व कामगिरी शरद पवार यांच्या नावावर आहे. ज्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात हा कार्यक्रम होत आहे, त्या क्रीडा संकुलाची उभारणीही शरद पवार यांच्या पुढाकाराने झाली आहे. अशा शरद पवारांना महिला सभी करण्याच्या नावाने अमलात आणलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाचे निमंत्रण नसणे हा सरकारच्या मनाचा कोतेपणा आहे, असे डॉ कोल्हे म्हणाले.
