Sunday, June 7, 2026
BLOGLatest NewsNATIONAL

बांगलादेशात तळ ठोकून ‘आयएसआय’ची ईशान्य भारतावर वक्रदृष्टी

एकीकडे संपूर्ण भारत देश आपला 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत असतानाच पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयने बांगलादेशात तळ ठोकून ईशान्य भारतात अस्थिरता निर्माण करणारे ऑपरेशन पिन कोड सुरू केले आहे. ईशान्य भारताचा बंगाल आणि आसाममधील तुकडा तोडून तो बांगलादेशला जोडायचा आणि बृहत बंगाल अर्थात बंगिस्तान तयार करायचा हे या ऑपरेशनचे मुख्य उद्दिष्ट आहे. 

शेख हसीना यांचे सरकार गेल्यापासून आयएसआय आणि त्याने पोचलेल्या दहशतवादी संघटनांना बांगलादेशात मोकळे रान मिळाले आहे. बांगलादेशाचा उपयोग करून घेऊन ईशान्य भारतात जम्मू काश्मीर सारखी परिस्थिती निर्माण करायची, असा आयएसआयचा डाव आहे. ऑपरेशन पिन कोडच्या कारवाया मार्गी लावण्यासाठी आयएसआयने ब्रिगेडियर टी के बक्ष या अधिकाऱ्याला बांगलादेशात पाठवले आहे. राजकीय पक्षाच्या बुरख्याखाली दहशतवाद पसरविणाऱ्या जमात इस्लामी या बांगलादेशातील संघटनेचे आणि मुस्लिम लिबरेशन फ्रंट या म्यानमारमधील संघटनेचे या ऑपरेशनमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. अब्दुल हसन मुहादिश हा जमात ए इस्लामीचा तर अब्दुल कादिर मुल्ला हा मुस्लिम लीबरेशन फ्रंटचा म्होरक्या आहे. 

ऑपरेशन पिन कोडसाठी हवालाने पैसा पुरवला जात आहे. त्याचप्रमाणे इस्लामिक बँक ऑफ सौदी अरेबियामधून इस्लामाबाद येथील इस्लामिक डेव्हलपमेंट बँकेत निधी पाठवला जाणार आहे. या बँकेच्या शाखा बांगलादेशात देखील आहेत. हा निधी प्रामुख्याने मुस्लिम समाजाच्या उन्नतीसाठी राबविल्या जाणाऱ्या योजना आणि उपक्रमांच्या नावाखाली येणार असला तरीही त्याचा वापर प्रामुख्याने ऑपरेशन पिन कोड साठी केला जाणार आहे. 

प बंगालला लागून असलेल्या बांगलादेशच्या सीमावर्ती भागात आयएसआय ने यापूर्वीच 19 दहशतवादी प्रशिक्षण तळ सुरू केले आहेत. बांगलादेशात अराजकाची परिस्थिती निर्माण होण्यापूर्वीपर्यंत या तळांवर मदरशातील तरुणांना आणून त्यांच्या मनात धार्मिक कट्टरता निर्माण करण्याखेरीज फारसे काही करणे शक्य होत नव्हते. शेख हसीना यांचे सरकार गेल्यापासून या तळांवर शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. 

प बंगाल आणि आसाममध्ये मदरशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक कट्टरता निर्माण करायची. त्यातील निवडक तरुण हेरून त्यांना दहशतवादी प्रशिक्षण तळावर प्रशिक्षण द्यायचे. प बंगालच्या सीमेवरून शस्त्रांसह दहशतवादी भारतात घुसवायचे. प्रामुख्याने हिंदू आणि मुस्लिम यांची लोकसंख्या विषम असलेल्या ठिकाणी धार्मिक तणाव निर्माण करायचा आणि दंगली घडवायच्या. सामाजिक वीण उसवायची, आशिया ऑपरेशनची कार्यपद्धती असणार आहे. 

या ऑपरेशनचा पुढचा टप्पा म्हणजे नशीला दहशतवाद! पंजाबमध्ये आयएसआय ने जे कारस्थान केले त्याची पुनरावृत्ती त्यांना ईशान्य भारतात करायची आहे. पंजाबमध्ये 70, 80 च्या सुमारास टीपेवर असणारा दहशतवाद तत्कालीन सरकारने 1990 मध्ये बळाचा वापर करून संपुष्टात आणला. दहशतवादात होरपळलेल्या मनांना सावरण्यासाठी पुनर्वसनाच्या नावाखाली आयएसआयने अमली पदार्थांचा भडीमार राज्यातील तरुणांवर केला. त्याचा परिणाम म्हणजेच उडता पंजाब! हेच आहे आयएसआयला ईशान्य भारतात घडवायचे आहे. 

धार्मिक कट्टरता निर्माण करायची, दंगली घडवून आणायच्या, दंगली आटोक्यात आणण्यासाठी सरकारने कठोर कारवाई केल्यानंतर सरकार आणि व्यवस्थेबद्दल द्वेष निर्माण करायचा, फुटीरतेची भावना वाढवायची आणि अखेर भूभाग गिळंकृत करायचा, असा हा डाव आहे. अर्थात काश्मीरमध्ये दीर्घकाळ प्रयत्न करूनही पाकिस्तानचा नापाक इरादा पूर्णतः यशस्वी झालेला नाही. ईशान्य भारतातही तो होण्याची शक्यता नाही. मात्र, त्यासाठी सरकारने पूर्ण ताकदीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सर्वसामान्य जनता, स्वयंसेवी संस्था संघटना आणि विशेषतः देशभरातील युवक यांनी ईशान्य भारतातील जनतेच्या मनात भारतीयत्वाची, राष्ट्रीयत्वाची भावना कायम तेवती राहील यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading