महायुतीतील जागा वाटपाचे सूत्र निश्चित : उदय सामंत
मुंबई: महा युतीतील जागा वाटपाचे सूत्र निश्चित झाले असून 20 ऑगस्ट रोजी भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख नेते त्यासंबंधीचा निर्णय अधिकृतपणे जाहीर करतील, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीत अर्थातच सर्वाधिक जागांवर भारतीय जनता पक्ष निवडणूक लढविणार आहे. भाजपने या निवडणुकीत दीडशेहून अधिक जागांवर उमेदवार उभे करावे, अशी मागणी पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत नेत्यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांना मोठी जबाबदारी
लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपाला लक्षणीय यश मिळाले नसल्याने देवेंद्र फडणवीस यांचे महत्त्व कमी झाल्याची चर्चा काही काळ केली जात होती. मात्र, विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविली आहे. भाजप राज्यातील कोणत्या मतदारसंघात निवडणूक लढविणार, त्या मतदारसंघात उमेदवार कोण असणार याची निवड करण्याचे सर्वाधिकार फडणवीस यांच्याकडे असणार आहेत. महायुतीतील घटक पक्षांतर्गत निर्णय मात्र केंद्रीय पातळीवर घेतले जाणार आहेत.
राज्यभरात समन्वय बैठकांचे आयोजन
लोकसभा निवडणुकीत महायुतीतील घटक पक्षांमध्ये योग्य समन्वय नसल्याची चर्चा होती. त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी महायुतीतील घटक पक्षांचे प्रमुख छत्रपती संभाजीनगर येथे राज्य स्तरावरील समन्वय बैठक घेणार आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक मतदारसंघात घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय राहावा यासाठी त्या त्या मतदारसंघातील प्रमुख नेत्यांच्या समन्वय बैठका व्हाव्या, अशी सूचना देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे घटक पक्षातील प्रमुख नेते विभागीय पातळीवरही समन्वय बैठका घेणार आहेत.
महायुतीचे पश्चिम महाराष्ट्रावर विशेष लक्ष
लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रातील 10 मतदारसंघांपैकी केवळ चार मतदारसंघात महायुतीला विजय मिळवता आला. राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या पश्चिम महाराष्ट्राचे राज्याच्या राजकारणात विशेष महत्त्व आहे हे लक्षात घेऊन महायुती पश्चिम महाराष्ट्रावर विशेष लक्ष देणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा 16 ऑगस्ट रोजी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत कराड विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्यासह महायुतीतील अनेक महत्त्वाचे नेते सहभागी असणार आहेत.
