Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

दुसऱ्यांचे अंतःकरण बोलून दुखवू नका ह.भ. प. रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर यांचे प्रतिपादन

 

पुणे : मोठ्या माणसाच्या समोर ताठपणा ठेऊ नये. संतांच्या समोर आपण नम्र असले पाहिजे. धूर्त माणसे देखील नमतात परंतु नमण्यात धूर्तपणा नाही तर आस्था हवी. संताच्या चरणावर आपले मस्तक असले पाहिजे हा सुद्धा भगवंतप्राप्तीचा सोपा मार्ग आहे. दुसऱ्यांच्या गुणदोषांची निंदा करु नका. दुसऱ्यांचे अंतःकरण बोलून दुखवू नका, असे प्रतिपादन ह.भ. प. रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर (विदर्भ रत्न मराठवाडा) यांनी केले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे चातुर्मासानिमित्त आयोजित कीर्तन महोत्सवात ते बोलत होते. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

संजय महाराज पाचपोर म्हणाले, अन्यायाला शिरजोर होऊ देऊ नका. देशामध्ये विधायकता कितीही वाढली तरी चालेल, पण विघातकता वाढू देऊ नका. अन्याय शिरजोर झाल्यानंतर कोणाला क्षमा करत नसतो. अन्यायाचा जर वेळीच प्रतिबंध नाही केला अन्याय हा शेवटी न्याय बनतो.

जगद्गुरु तुकोबारायांचे अभंग महाराज फक्त कीर्तन करण्यासाठी नाही तर महाराजांचे अभंग आपल्याला सावध करण्यासाठी आपल्या परिवर्तनासाठी आहेत. जे गरज असेल ते देणारा आणि ज्याला गरज असेल त्याला देणारा खरा दाता आहे. गरज नसताना जर तुम्ही दान देत असाल तर खऱ्या अर्थाने ते विलासामध्ये परिवर्तित होईल, असेही त्यांनी सांगितले.

महोत्सवात दररोज सायंकाळी ५.३० वाजता अनुक्रमे आळंदी साधक आश्रमाचे ह.भ.प. यशोधन महाराज साखरे, जळगावचे ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, अहिरेगावचे ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे हे कीर्तन करणार आहेत. महोत्सवाला प्रवेश खुला असून कीर्तनाचा भाविकांनी आनंद घ्यावा, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading