बांगलादेशचे संभाव्य अंतरिम सरकार भारतासाठी डोकेदुखी ठरणार?
नवी दिल्ली: बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर लष्कराने सत्ता हातात घेतली आहे. लोकशाही कायम ठेवण्यासाठी लष्कराच्या पुढाकाराने त्या देशात सर्वपक्षीय अंतरिम सरकार स्थापन केले जाणार आहे. शेख हसीना यांच्या कार्यकाळात भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध खूपच सौहार्द होते. मात्र, संभाव्य अंतरिम सरकार भारतासाठी डोकेदुखी ठरणार आहे तर भारतावर कुरघोडी करण्याची संधी न सोडणारा चीन आणि पाकिस्तान यांचे मात्र फावणार आहे.
बांगलादेशातील हिंसक आंदोलन नाट्याची पटकथा पाकिस्तानी गुप्तहेर यंत्रणा आयएसआयने लिहिलेली होती तर जमाते इस्लामी या पाक पुरस्कृत दहशतवादी संघटनेने त्याचे दिग्दर्शन केले होते. या नात्याला चीनने साधनसामग्री पुरवली होती. त्यामुळे शेख हसीना सरकार गेल्यानंतर स्थापन होणाऱ्या अंतरिम सरकारच्या कार्यकाळात चीन आणि पाकिस्तान बांगलादेशात आपले हात धुवून घेणार हे निश्चित आहे.
सीमा सुरक्षेला धोका
भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान तब्बल 4 हजार 96 किलोमीटर आणि 70 मीटर एवढी विस्तीर्ण आंतरराष्ट्रीय सीमा आहे. भारतातील बंगाल, आसाम, त्रिपुरा, मणिपूर, मेघालय, मिझोराम ही राज्य बांगलादेशच्या सीमेवर वसलेली आहेत. जगातील सर्वात मोठ्या सीमारेषांपैकी भारत आणि बांगलादेश मधील सीमारेषा पाचव्या क्रमांकाची आहे. बांगलादेशातून भारतात घुसखोरी केली जाते. अंतरिम सरकारच्या कार्यकाळात चीन आणि पाकिस्तानच्या पुढाकाराने बांगलादेशातून देशविघातक शक्तींची घुसखोरी होण्याची भीती अधिक प्रमाणात वाढणार आहे. त्याचप्रमाणे ईशान्येकडील मणिपूर सारख्या अस्वस्थ राज्यांमध्ये विघटनवादी कारवाया करण्यासाठी चीन आणि पाकिस्तानला अधिक वाव मिळणार आहे. अर्थातच बांगलादेश मधील परिस्थितीमुळे सीमा सुरक्षा दल अधिक सतर्क झाले असून त्यांनी भारत-बांगला सीमेवर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे.
बांगलादेशातील हिंदू जनतेच्या सुरक्षिततेचा प्रश्न
बांगलादेशात सात टक्के हिंदू नागरिक राहतात. शेख हसीना पायउतार होताच बांगला देशातील हिंदू अल्पसंख्यांक समाजावर अत्याचार सुरू झाले आहेत. हिंदूंची घरे दुकाने आणि मंदिरे लुटण्यात आणि जाळण्यात येत आहेत. हिंदूंना अमानुष मारहाण केली जात आहे. अशा काळात बांगलादेशातील हिंदू जनता भारताकडे मदतीसाठी अपेक्षेने पाहते. त्याचबरोबर अत्याचार ग्रस्त जनतेची भारतातील घुसखोरी ही वाढते. त्यामुळे बांगलादेशातील हिंदूंवर होणारे अत्याचार ही भारतासाठी दुहेरी डोकेदुखी ठरते.
निर्यात, व्यापार व गुंतवणुकीवर विपरीत परिणाम
भारताकडून बांगलादेशात कांदा, शेतीसाठी आवश्यक उपकरणे व अवजारे, औद्योगिक यंत्रसामुग्री, वीज, पेट्रोलियम पदार्थ यांची निर्यात केली जाते. भारत आणि बांगलादेशात १२.९ अब्ज डॉलरचा व्यापार केला जातो. भारत आणि बांगलादेशात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. वीज प्रकल्प, कापड उत्पादन, औषध निर्मिती अशा अनेक क्षेत्रात भारताची बांगलादेशात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आहे.
