राज ठाकरे यांची परप्रांतीयानबाबतीत भूमिका देशात फूट पाडणारी – प्रकाश आंबेडकर
अमरावती : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची परप्रांतीयानबाबतीत भूमिका समाज घटकांमध्ये आणि देशात फूट पाडणारी आहे. त्यामुळे राज्य सरकारने हिम्मत दाखवून ठाकरे यांना टाडा, मोक्का किंवा राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करून गजाआड करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली.
ठाणे ही सर्वाधिक लोकसंख्या वाढ असलेली महानगरपालिका असून ठाणे शहरात एकूण ८ महानगरपालिका मावतील एवढी लोकसंख्या आहे. महापालिकेच्या माध्यमातून आपण परराज्यातून आलेल्या लोकांसाठी खर्च करत आहोत, असे मत ठाकरे यांनी व्यक्त केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना आंबेडकर यांनी ठाकरे यांना अटक करण्याची मागणी केली आहे.
हे विधान म्हणजे ‘ब्रेकअप दि नेशन’
राज ठाकरे यांचे हे विधान समाज आणि देशाला दुभंगणारे आहे. त्यामुळे ठाकरे यांना थेट तुरुंगात टाकले पाहिजे. मराठी माणूस देशभरात पसरलेला आहे. मध्य पदेश आणि गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर मराठी माणूस आहे. उत्तर प्रदेश आणि ओरिसात मराठी माणूस आहे. या राज्यातील स्थानिक लोकांनी मराठी माणसांच्या विरोधात उठाव केला तर त्याचे काय करायचे, असा सवाल आंबेडकर यांनी केला.
महाराष्ट्राला शांत करण्याचा आमचा प्रयत्न
सध्या जाती जातींमध्ये निर्माण झालेली तेढ पाहता महाराष्ट्राचा मणिपूर होण्याची भीती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी व्यक्त केली होती. त्यावर बोलताना राज ठाकरे यांनी, महाराष्ट्राचा मणिपूर होण्यासाठी तुम्ही हातभार लावू नका, असा टोला पवार यांना लगावला. त्याबाबत, तुमची मिलीभगत चालू द्या. आम्हाला महाराष्ट्राला शांत करायचे आहे आणि त्यासाठी आमचे कसून प्रयत्न सुरू आहेत, असेही आंबेडकर म्हणाले.
शिवसेनेची मते एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडेच
लोकसभा निवडणुकीतील शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा स्ट्राईक रेट उद्धव ठाकरे गटाच्या दुप्पट आहे. मतदार शिंदे यांच्या शिवसेनेलाच खरी शिवसेना मानत आहेत. शिवसेनेची मते शिंदे गटाकडेच राहिली आहेत. ठाकरे गटाचा जो स्ट्राईक रेट आहे तो आरक्षणवादी आणि मुस्लिम मतांमुळे आलेला आहे. मात्र, हे मतदार धर्मवादी पक्षाला कायम मत देणारे नाहीत. काँग्रेससारख्या पक्षाने महाविकास आघाडीच्या बैठकीत ठाकरे गटाला याची जाणीव करून देणे आवश्यक होते. मात्र, काँग्रेस पक्षाला कणा नाही. त्यामुळे तेही हिम्मत दाखवू शकत नाहीत, अशी टीकाही आंबेडकर यांनी केली.
