Monday, June 15, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

फेक नॅरेटिव्हचे आयते कोलीत भाजपनेच विरोधकांना दिले – राज ठाकरे

सोलापूर: लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी फेक नॅरेटिव्ह पसरवल्यामुळे भारतीय जनता पक्षाला अपेक्षित कामगिरी करता आली नाही, असा दावा केला जातो. मात्र, संविधान बदलाचे फेक नॅरेटिव्हचे आयते कोलीत भाजपच्या लोकांनीच विरोधकांच्या हाती दिले, हे स्पष्ट करताना ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला.

विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी येथे पत्रकारांशी संवाद साधला.

सर्वप्रथम अयोध्या येथील भाजपाच्या तत्कालीन खासदारांनी, आपण 400 पार झाल्यानंतर संविधान बदलणार असल्याचे विधान पहिल्यांदा केले. त्यानंतर भाजपच्याच अनेक लोकांनी त्याचा पुनरुच्चार केला. तोपर्यंत संविधान बदलाची कुठे चर्चाही नव्हती. त्यामुळे संविधान बदलाच्या फेक नॅरेटिव्हला विरोधकांपेक्षा भाजपच जास्त जबाबदार आहे, असे ठाकरे यांनी निदर्शनास आणून दिले.

लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपण भाजपला पाठिंबा देत असल्याचे स्पष्ट केले होते. त्यावेळी विधानसभा निवडणुकीबाबत आपण काहीही बोललेलो नव्हतो, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व राज्यांकडे समान दृष्टीने पाहिले पाहिजे. ऑलिंपिक गुजरात मध्ये, सर्वात मोठे मैदान गुजरातमध्ये असे होता कामा नये. उद्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला आणि त्याने इतर राज्यांकडे दुर्लक्ष करून महाराष्ट्राला झुकते माप दिले तरी आपण त्याचा विरोधच करू, असेही ठाकरे म्हणाले.

आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला आहे. पक्ष राज्यातील सुमारे अडीचशे जागांवर निवडणूक लढविण्याची तयारी करणार आहे. पक्षाच्या 16 संभाव्य उमेदवारांची नावे जाहीर झाली असून शिवडी मतदार संघातून बाळा नांदगावकर तर पंढरपूर मतदार संघातून दिलीप धोत्रे यांची उमेदवारी राज ठाकरे यांनी जाहीर केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading