आपल्या निवासस्थानी सक्तवसुली संचालनालयाची धाड पडणार : राहुल गांधी
नवी दिल्ली: आपले संसदेतील ‘चक्रव्यूह भाषण’ दोघांपैकी एकाला आवडलेले नाही. त्यामुळे आपल्या निवासस्थानी सक्तवसुली संचालनालयाची धाड पडणार आहे. आपण इडीवाल्यांचे स्वागत करण्यास तयार असून त्यांना चहा, बिस्कीट देऊ, अशी उपरोधिक टीका विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे.
संसदेत नुकत्याच केलेल्या एका भाषणामध्ये राहुल गांधी यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली होती. भारतीय जनता पक्ष कमळरूपी चक्रव्यूहात देशातील गोरगरीब जनता, युवक आणि महिलांना अडकविण्याच्या प्रयत्नात आहे. इंडिया आघाडी ही शिवाची वरात असून त्यात कोणालाही मज्जाव नाही. चक्रव्यूह आणि शिवाची वरात यात युद्ध सुरू आहे, असे राहुल गांधी या भाषणात म्हणाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही त्यांनी कठोर टीका केली.
आपले हे भाषण दोघांपैकी एकाला आवडलेले नाही. त्यामुळे आपल्या निवासस्थानी ईडीची झाड टाकण्याची तयारी सुरू असल्याची माहिती ईडीच्याच अधिकाऱ्यांनी आपल्याला दिल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. आपण त्यांचे स्वागत करू. चहा, बिस्किट येऊन त्यांचा पाहुणचार करू, असेही राहुल गांधी यांनी समाजमाध्यमावर नमूद केले आहे.
