वेशांतर करून दिल्लीला जात असल्याची आवई केवळ आपल्याला बदनाम करण्यासाठी – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड पुकारून महायुती बरोबर जाण्यापूर्वी गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे रणनीतीकार अमित शहा यांना भेटण्यासाठी आपण वेशांतर करून दिल्लीला जात असल्याची आवई केवळ आपल्याला बदनाम करण्यासाठी उठविली जात आहे. ही वेशांतराची बाब सिद्ध झाली, तर आपण राजकारण सोडून घरात बसून राहू, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
अमित शहा यांना भेटण्यासाठी दिल्लीला जाताना आपण वेशांतर करून टोपी घालून, मास्क लावून आणि विमानाच्या तिकिटासाठी दुसरेच नाव देऊन प्रवास करत असू, असे खुद्द अजित पवार यांनीच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना सांगितल्याची वृत्त काही काळापूर्वी प्रसिद्ध झाली. त्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्याकडून अजित पवार यांना टीकेचे लक्ष्य करण्यात आले. मात्र, अजित पवार यांनी वेशांतराचा प्रकार सपशेल नाकारला आहे.
आपल्याला लपून-छपून राजकारण करण्याची सवय नाही. जिथे कुठे जायचे तिथे उजळ माथ्याने छाती ठोकपणे जाऊ. सध्या आपल्या बदनामीची मोहीम राबवली जात आहे. महायुती सरकारच्या अनेक चांगल्या योजना येत आहेत आणि त्याला जनतेकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे पायाखालची वाळू सरकलेल्या विरोधकांकडून खोटी कथिते अर्थात फेक नॅरेटिव्ह पसरवली जात आहे. आपल्यावरील वेशांतराचा आरोप हा त्याचाच एक भाग आहे. जर हा आरोप सिद्ध झाला तर आपण राजकारण सोडून देऊ, असे पवार म्हणाले.
सकाळच्या भोंग्याची उचलली जीभ लावली टाळ्याला
सध्या सकाळचां जो भोंगा वाजतो त्याच्याकडून उचलली जीभ लावली टाळ्याला, असा प्रकार सुरू आहे, अशा शब्दात पवार यांनी नाव न घेता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना टोला लगावला. सध्या वाचाळवीरांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सध्या जो काही बोलघेवडेपणा सुरू आहे तो अयोग्य आहे. कोणत्याही आगापिछा नसलेल्या, बिनबुडाच्या बातम्या प्रसिद्ध केल्या जात आहेत, असेही पवार म्हणाले.
