वारकरी संप्रदाय समजून घेण्यासाठी संतांचे विचार समजून घ्या
डॉ.पंकज उर्फ चेतनानंद महाराज यांचे मत
पुणे : संसार आणि परमार्थ दोन्ही करताना तुमचे कल्याण होऊ शकतो, अनन्यभावाने ईश्वराला सामोरे जा हे सांगणारा वारकरी संप्रदाय हा एकमेव आहे. वारकरी संप्रदाय समजून घ्यायचा असेल तर संत ज्ञानदेव, संत एकनाथ आणि संत तुकोबा यांचे विचार समजून घ्यावे लागतील,असे मत श्री क्षेत्र भंडारा डोंगर जगद््गुरुकृपांकित डॉ.पंकज उर्फ चेतनानंद महाराज यांनी व्यक्त केले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे चातुर्मासानिमित्त आयोजित प्रवचन व कीर्तन महोत्सवाच्या पाचव्या दिवशी ज्ञानोबा-तुकोबांचे पंढरी महात्म्य या विषयावर ते बोलत होते. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे प्रवचनमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ.पंकज उर्फ चेतनानंद महाराज म्हणाले, पंढरीचे महात्य समजून घेण्यासाठी संतांचे भाव समजून घ्यावे लागतील. ज्ञानोबांचा भाव आहे भूता परस्परे जडो मैत्र जिवांचे, संत एकनाथ यांचा भाव एका जनार्दनी, तर ‘कोणा ही जिवाचा न घडो मत्सर’ हा संत तुकाराम यांचा भाव आहे.
पंढरीची वारी कोणी करावी हे सांगताना ते म्हणाले, ज्यांना व्यवस्थापन शिकायचे आहे त्यांनी वारी करा आणि ज्यांना माणूस व्हायचे आहे, त्यांनी वारीत जा. जगण्याला अर्थ देण्यासाठी वारी करा. प्रतिकूल परिस्थित संघर्ष करताना मानसिकता स्थिर ठेवायची आहे, त्यांनी वारी करावी, असेही त्यांनी सांगितले. पांडुरंगाच्या भेटीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा केली तर त्या सेवेत सुद्धा पांडुरंग भेटेल हे वारकरी संप्रदायाचे तत्व आहे.
प्रवचनात श्री ज्ञानोबा-तुकोबांविषयी इतिहास व परंपरा, मानसशास्त्र, समाजशास्त्र, विज्ञान, पंढरी महात्म्य, नीतिशास्त्र, पसायदान याविषयी चेतनानंद महाराज निरुपण करणार आहेत. विश्व माऊली ज्ञानोबाराय व जगद्गुरु तुकोबाराय यांचे जीवन समृद्ध करणारे चरित्र व तत्वज्ञान यानिमित्ताने ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे.
