पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच युक्रेनचा दौरा करणार
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच युक्रेनचा दौरा करणार असून रशिया आणि युक्रेन यांच्यात तब्बल दोन वर्षापासून सुरू असलेले युद्ध थांबवण्याच्या दृष्टीने मोदी यांची युक्रेन भेट हे महत्त्वाचे पाऊल ठरेल, असा विश्वास आंतरराष्ट्रीय राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.
नरेंद्र मोदी यांनी नुकताच रशियाचा दौरा केला असून या दौऱ्यात रशियाचे राष्ट्रप्रमुख व्लादिमीर पुतिन यांच्याशी त्यांची प्रदीर्घ चर्चा झाली. युद्ध हा समस्या सोडवण्याचा मार्ग नाही हे मोदी यांनी यापूर्वीच पुतीन यांना सांगितले होते. या दौऱ्यातही मोदी यांनी चर्चेने प्रश्न सोडविण्याचे आवाहन त्यांना केले. युद्ध समाप्तीच्या दृष्टीने दोन्ही नेत्यांमध्ये काही बाबींवर सहमती झाल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मोदी यांची युक्रेन भेट आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची ठरणार आहे.
युक्रेनमध्ये 24 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाच्या आसपासच मोदी हे कीव शहराला भेट देणार आहेत. या दौऱ्यात ते युक्रेनचे अध्यक्ष ब्लादिमीर झेलेन्सकी यांच्याशी चर्चा करणार आहेत. या पूर्वी जी ७ परिषदेत झेलेन्सकी यांनी मोदी यांना युक्रेन भेटीचे आमंत्रण दिले होते. भारत आणि रशिया या देशांमध्ये पूर्वापार कनिष्ठ संबंध आहेत. त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी आणि पुतीन यांच्यातही कनिष्ठ मैत्री आहे. त्यामुळे खुद्द झेलेन्सकी यांनी या युद्धात मध्यस्थी करण्याचे आवाहन मोदी यांना केले होते. मोदी यांच्या रशिया पाठोपाठ युक्रेन भेटीमुळे या दोन देशातील समस्यांमधून काही मार्ग निघण्याची आणि दीर्घकाळ सुरू असलेल्या युद्धाला विराम मिळण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यक्त केली जात आहे.
