Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

गुरुतत्त्वाशी सुसंवाद घडल्यास जीवनाचा आनंद गवसेल : अभयकुमार सरदार

पुणे : गुरुतत्त्वयोग तत्त्वज्ञान सामुदायिक सहजीवनाचा अंगिकार करते. गुरुतत्त्वाच्या मार्गदर्शनानुसार मानव खऱ्या अर्थाने आपले जीवन जगू लागल्यास त्याला सामुदायिक सहजीवनाचे आकलन होईल, त्यानुसार त्याचे जगणे घडेल. गुरुतत्त्वाशी सुसंवाद घडल्यास, त्याचे आकलन झाल्यास मानव नित्यनूतन म्हणून जगत राहील आणि त्याला जीवनाचा खरा आनंद गवसेल, असे प्रतिपादन गुरुतत्त्वयोग तत्त्वज्ञान प्रणालीचे प्रणेते अभयकुमार सरदार यांनी केले.
गुरुतत्त्वयोग सार्वजनिक धर्मार्थ विश्वस्त संस्थेतर्फे गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्त ‌‘मनुष्य आणि निसर्गाचे सामुदायिक सहजीवन‌’ या विषयावर प्रदर्शनी भरविण्यात आली होती. या प्रसंगी गुरुतत्त्ववेध स्मरणिकेचे प्रकाशन अभयकुमार सरदार, हेमलता मांडे, तेजा दिवाण, शितल पंडित, मयुरा मोरे यांच्या हस्ते झाले. गुरुतत्त्वयोग, 1221/अ/2, रॅग्लर परांजपे रोड, हॉटेल वैशाली जवळ येथे कार्यक्रम झाला.
प्रदर्शनीच्या अनुषंगाने मार्गदर्शन करताना सरदार पुढे म्हणाले, निसर्गाची काळजी घेणाऱ्या जमाती आजही अस्तित्वात आहेत. शहरीकरणामुळे आपण या सगळ्यापासून दूर गेलो आहोत. निसर्गात सर्वत्र चैतन्य व्यापून उरले आहे; परंतु ते आपल्याला दिसत नाही कारण आपण एकाच जाणिवेत, प्रकृतीच्या खेळात अडकलो आहोत. आपले बाह्य अस्तित्व विसरून, प्रकृतीच्या खेळातून बाहेर पडू शकलो तर आपल्यालाही सृष्टीतील चैतन्याचे दर्शन घडेल. विश्वात्मक पंचमहाभूतांशी एकरूप झाल्यास त्यांचे अस्तित्व, चैतन्यगती, जाणीव आपण समजू शकतो व सामुदायिक सहजीवनाचा सहजतेने स्वीकार करू शकतो.
ते पुढे म्हणाले, गुरुतत्त्वयोग तत्त्वज्ञान गुरू-शिष्य परंपरा मानत नाही; कारण लौकिक अर्थाने जो शिकवितो तो गुरू आणि जो शिकतो तो शिष्य; परंतु गुरुतत्त्व तत्त्वज्ञानानुसार विश्वातील प्रत्येक घटक काही ना काही तरी शिकवीत असतो; त्यामुळे सर्वत्र गुरूचेच प्रकटीकरण आहे.
सुरुवातीस उमा शिंदे आणि प्रचिती पाध्ये या साधकांनी अनुभवकथन केले. त्यानंतर गुरुतत्त्वयोग शरणागत साधना झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, स्वागत तेजा दिवाण यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading