आम्ही चालवू हा पुढे वारसा… या भावनेने संपन्न झाला ‘अनुग्रह’ कार्यक्रम
पुणे : गुरूने दिलेला वसा समर्थपणे पुढे चालविण्याचे आश्वासन देणाऱ्या गुणी शिष्या, आपल्या शिष्यांकडे कौतुकाने पाहणारे गुरु आणि या गुरु शिष्यांमधील अलौकिक नात्याचे दर्शन अनुभवणारे प्रेक्षक अशा भावपूर्ण वातावरणात बालगंधर्व रंगमंदिर येथे ‘अनुग्रह’ हा कार्यक्रम संपन्न झाला.
पुण्यातील कलावर्धिनी या नृत्यसंस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत ‘अनुग्रह’ या विशेष नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ भरतनाट्यम गुरु डॉ सुचेता भिडे चापेकर, गुरू स्मिता महाजन, सुप्रसिद्ध अभिनेत्री सुकन्या मोने, भारती विद्यापीठचे शारंगधर साठे, भारतीय विद्याभवनचे नंदकुमार काकिर्डे, असे अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कलावर्धिनी नृत्य संस्थेच्या वतीने दरवर्षी गुरुपौर्णिमेनिमीत्त भरतनाट्यम गुरु डॉ सुचेता भिडे चापेकर यांना मानवंदना दिली जाते. यावर्षी डॉ सुचेता भिडे चापेकर यांच्या ज्येष्ठ शिष्या व सुप्रसिद्ध भरतनाट्यम गुरु स्मिता महाजन यांच्या षष्ट्याब्दीनिमीत्त ‘स्मितवाच’ हा विशेष कार्यक्रम सादर झाला. यामध्ये कलावर्धिनीच्या अरुंधती पटवर्धन यांच्या शिष्यांनी स्मिता महाजन यांनी लिहिलेल्या, संगीतबद्ध केलेल्या रचनांचे सादरीकरण केले.
माझा हा सर्व शिष्य परिवार माझी नृत्यपरंपरा यशस्वीपणे पुढे नेत असल्याचा आनंद आणि अभिमान आहे, अशा भावना डॉ सुचेता भिडे चापेकर यांनी यावेळी व्यक्त केल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कलावर्धिनी नृत्यसंस्थेच्या वतीने सुचेताताई आणि स्मिता महाजन यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
तीन देवींच्या श्लोक सादरीकरणाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. यानंतर ‘मल्लारी’ ही पारंपारिक भरतनाट्यम मधील रचना सादर झाली. दोन रागांच्या संगमातून स्मिता महाजन यांनी साकारलेल्या राग वृंदावन मोहनम मधील जतीस्वरमधील नृत्यरचनेच्या सादरीकरणाने उपस्थितांना खिळवून ठेवले. नृत्य हे दृश्य संगीत मानले जाते आणि या नृत्यरचनांमधून स्मिता महाजन यांची संगीताची जाण उपस्थितांनी अनुभविली.
यानंतर ‘रती कौतुकम…’ हे बहारदार सादरीकरण झाले. ‘सांग सखे हे असे कसे…’ या रंग प्रवेशमच्या विद्यार्थीनींनी सादर केलेल्या वर्णमने उपस्थितांची मने जिंकली. यानंतर अरुंधती पटवर्धन यांच्या ज्येष्ठ शिष्यांनी ‘रागावू कशी तुला…’ हे पद प्रस्तुत केले. यानंतर ‘लक्ष्मी पार्वती संवाद’ संपन्न झाला. तंजावर येथील मराठी राजांनी लिहिलेल्या काव्यावर आधारित जक्किणी समूह रचना सादरीकरणाने सभागृहातील रसिक भारावून गेले. या काव्याची नृत्यरचना डॉ सुचेताताई यांचे होती. अरुंधती पटवर्धन यांनी सादर केलेल्या ‘मूर्त म्हणू की अमूर्त म्हणू…’ या भक्तिपदाने कार्यक्रमाचा समारोप झाला.
कार्यक्रमामध्ये नंदिनी गुजर (गायन), यशवंत हंपीहोली (मृदंगम), बी अनंथरामन (व्हायोलिन) आणि अरुंधती पटवर्धन (नटुवंगम) यांनी साथसंगत केली तर सागरिका पटवर्धन यांनी सूत्रसंचालन केले.
