Sunday, June 7, 2026
BLOGLatest NewsNATIONALTOP NEWS

बांगलादेशात आंदोलनाला चीनकडून रसद

बांगलादेशात सध्या अराजकाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारी नोकरीतील आरक्षणाला विरोध करणाऱ्यांनी देशात हिंसेचा आगडोंब उसळवला. सरकार त्याचा ठाम प्रतिकार करत आहे. केवळ पोलीसच नव्हे तर खुद्द लष्करही रस्त्यांवर तैनात करण्यात आले आहे. बांगलादेशमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली असून कायदा हातात घेणाऱ्यांना जागीच गोळ्या घालण्याचे आदेश पोलिस आणि लष्कराला दिले आहेत. आतापर्यंत तरी पंतप्रधान शेख हसीना यांनी कणखरपणे परिस्थितीला तोंड दिले आहे. मात्र, भारताशी जवळीक असलेल्या शेख हसीना यांना सत्ताभ्रष्ट करून धार्मिक कट्टरतावाद्यांना सत्तेच्या किल्ल्या सोपविणे आणि पर्यायाने बांगलादेशाला आपला मांडलिक बनविणे, हे चीनचे उद्दिष्ट असून त्यासाठी या हिंसक आंदोलनाला चीनकडून रसद पुरविली जात आहे. 

काही दिवसांपूर्वी शेख हसीना या चीनच्या दौऱ्यावर गेल्या होत्या. किनी राष्ट्रप्रमुख शी जिनपिंग यांच्याशी त्यांची भेटही झाली. चीनने बांगलादेशला पाच अब्ज डॉलरची मदत देण्याचे आश्वासन दिले होते. मुख्यतः त्यासाठीच शेख हसीना यांनी चीनचा दौरा केला. प्रत्यक्षात या दौऱ्यात चीनने तुलनेने अत्यल्प रक्कम बांगलादेशला देऊ केली. दुसरे म्हणजे या दौऱ्यात शेख हसीना यांना एका देशाच्या पंतप्रधान म्हणून औपचारिकरित्या जो मानसन्मान मिळायला हवा होता तो मिळाला नाही. चिनी माध्यमांनी देखील शेख हसीना यांच्या दौऱ्याची फारशी दखल घेतली नाही. दौरा अपूर्ण असताना अचानकच, आपल्या मुलीची तब्येत ठीक नाही, असे कारण पुढे करून शेख हसीना तातडीने मायदेशी परतल्या. एक राष्ट्रप्रमुख मुलीला बरे नाही या कारणासाठी चीनसारख्या बलाढ्य देशाचा दौरा अर्धवट सोडून येतील, हे पटण्यासारखे नाही. चीनमध्ये असताना शेख हसीना यांना अशी कोणती माहिती मिळाली किंवा संदेश मिळाला की ज्यामुळे त्या आपला दौरा अर्धवट सोडून माघारी परतल्या, हे अजून तरी गुलदस्त्यात आहे. या दौऱ्यानंतर अल्पकाळातच बांगलादेशात हिंसक आंदोलनांनी पेट घेतला. 

बांगलादेश सन 1972 मध्ये स्वतंत्र झाल्यानंतर बांगलादेश सरकारने देश स्वतंत्र करण्यासाठी प्राण होती देणाऱ्या, सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या मुक्ती वाहिनीच्या स्वातंत्र्यवीरांच्या कुटुंबासाठी शासकीय नोकऱ्यांमध्ये तब्बल 80 टक्के आरक्षण लागू केले. कालांतराने ते कमी कमी करत सध्या स्वातंत्र्यवीरांच्या कुटुंबांसाठी 30 टक्के आरक्षणाची तरतूद आहे. इतर आरक्षणे मिळून बांगलादेशमध्ये सरकारी नोकऱ्यांत सुमारे 50 टक्के आरक्षण आहे. या आरक्षणाला, विशेषतः स्वातंत्र्यवीरांच्या कुटुंबीयांना दिल्या जाणाऱ्या आरक्षणाला आंदोलकांचा विरोध आहे. 

बांगलादेश पूर्व बंगाल असताना, अर्थात स्वातंत्र्यापूर्व काळात स्वातंत्र्ययोद्ध्यांना पाकिस्तानी लष्कराकडून मोठ्या अत्याचाराला सामोरे जावे लागले. स्वातंत्र्यपूर्वकाळात पूर्व बंगालमध्ये तब्बल 30 लाख जणांची कत्तल करण्यात आली तर दहा लाख महिलांवर पाक सैन्याने लैंगिक अत्याचार केले. हे सर्व भोगून स्वातंत्र्य मिळवणाऱ्या वीरांच्या कुटुंबीयांबद्दलची कृतज्ञता म्हणून देण्यात येणारे हे आरक्षण ज्यांच्या डोळ्यात खुपत आहे, ते बांगलादेशातील धार्मिक कट्टरतावादी आहेत. आरक्षण हे केवळ निमित्त आहे. प्रत्यक्षात भारताशी जवळीक असलेल्या शेख हसीना यांच्या हाती सत्ता असणे, हे त्यांचे खरे दुःख आहे. त्यांना बांगलादेशचा पाकिस्तान करायचा आहे. पाकिस्तान चीनची जशी हुजरेगिरी करतो तशी बांगलादेशने करावी, अशी चीनची इच्छा आहे. मात्र, शेख हसीना तसे करीत नसल्यामुळे त्यांना सत्तेवरून हटविण्यासाठी चीन धार्मिक कट्टरतावाद्यांना पोसत आहे. भडकवत आहे. 

चीनचा दौरा अर्धवट सोडून परत आल्यानंतर शेख हसीना यांनी केलेली एक कृती चीनच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. बांगलादेशमधील तिस्ता नदी ही एक अतिशय बेभरवशाची नदी आहे. हिमालयातील बर्फ वितळून पाण्याचे मोठेच्या मोठे लोट केव्हा तिस्ता नदीत वाहून येतील हे सांगता येत नाही. त्यामुळे या नदीच्या बाजूला असलेल्या नागरिकांना सातत्याने पूर परिस्थितीला तोंड द्यावे लागते. त्यामुळे जीवित आणि वित्तहानी ही मोठ्या प्रमाणावर होत असते. यावर उपाय म्हणून या नदीवर प्रचंड मोठे धरण बांधण्याचा प्रकल्प बांगलादेशच्या सरकारला साकारायचा आहे. तब्बल एक अब्ज डॉलरचा हा प्रकल्प उभा करण्याची बांगलादेश सरकारची क्षमता नसल्याने तो इतर देशांनी हाती घ्यावा, अशी त्यांची इच्छा आहे. या प्रकल्पावर अर्थातच चीनचा डोळा होता. मात्र, शेख हसीना यांनी अत्यंत स्पष्टपणे, चीन हा प्रकल्प उभारू शकतो यात शंकाच नाही. मात्र, हा प्रकल्प भारताने हाती घ्यावा, अशी आमची इच्छा आहे. शेख हसीना यांच्या या स्पष्टोक्तीमुळे चीनच्या नाकाला मिरच्या झोंबणे स्वाभाविकच आहे. या तात्कालीक कारणामुळे डिवचल्या गेलेल्या ड्रॅगनने आधीचा फुत्कार बांगलादेशात सोडला आहे. शेख हसीना त्याचा  कणखरपणे किती मुकाबला करतात, हे केवळ बांगलादेशसाठीच नाही तर भारतासाठी ही महत्त्वाचे आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading