शरद पवार गटात घरवापसी करणार असल्याच्या केवळ अफवा – वैभव पिचड
अहमदनगर: राष्ट्रवादी काँग्रेस मधून भारतीय जनता पक्षात आलेले ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड आणि त्यांचे चिरंजीव वैभव पिचड शरद पवार गटात घरवापसी करणार असल्याच्या केवळ अफवा पसरविल्या जात असल्याचे खुद्द वैभव पिचड यांनीच स्पष्ट केले.
मधुकरराव पिचड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून राज्याचा कानाकोपरा पिंजून काढला आणि पक्ष मोठा केला. भाजपमध्ये आल्यावर तेच काम आम्ही भाजपसाठी प्रामाणिकपणे करीत आहोत. तालुक्यात सर्वत्र पक्षाचे कमळ पोहोचविण्याचे काम आम्ही केले आहे. इतकी वर्ष काम केल्यानंतर आम्ही भाजपमध्ये खऱ्या अर्थाने रुळले आहोत. त्यामुळे शरद पवार गटात घर वापसी करण्याचा प्रश्नच येत नाही, असे वैभव विचार यांनी स्पष्टपणे सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महायुतीचा घटक असून अकोले विधानसभा मतदारसंघात डॉ किरण लहामटे हे त्या पक्षाचे आमदार आहेत. अर्थातच आगामी विधानसभा निवडणुकीत वैभव पिचड यांना डावलून महायुतीकडून डॉ लहामटे यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिचड पिता-पुत्र शरद पवार गटात घरवापसी करणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, वैभव पिचड यांनी तूर्तास या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
गर्दी जमवण्यासाठी घरवापसीच्या चर्चा?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांचा सध्या राज्याचा दौरा सुरू असून नगर जिल्ह्यात त्यांच्या कार्यक्रमांना गर्दी जमवण्यासाठी मधुकर पिचड आणि वैभव पिचड पक्ष बदलणार असल्याच्या चर्चा घडविल्या जात आहेत का, असा सवाल वैभव पिचड यांनी केला. त्याचप्रमाणे आपले पक्षातर्गत आणि इतरपक्षीय विरोधक कार्यकर्त्यांमध्ये आणि भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण करण्यासाठी हा अपप्रचार करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
विधानसभेची उमेदवारी मिळण्याबाबत आशावादी
महायुतीकडून आमदार सांभाळण्यासाठी नव्हे तर कामाचे मूल्यमापन करून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी उमेदवारी दिली जाते, असे सांगत वैभव पिचड आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळण्याबाबत आपण आशावादी असल्याचे सूचित केले. त्याचप्रमाणे त्यांनी आमदार डॉ लहामटे यांच्यावर त्यांनी टीकाही केली. अकोले तालुका हा राजकीय दृष्ट्या आणि विशेषतः पाण्याच्या प्रश्नासाठी सजग आणि संवेदनशील आहे. विद्यमान आमदार आपल्या कार्यकाळात पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी काहीही करू शकले नाहीत, असा दावाही त्यांनी केला.
